शिवसेना शिंदे गटाच्या मराठवाड्यातील मोठ्या नेत्याने एक विधान केलय. त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “सध्या जे राजकारण सुरु आहे ते भविष्यासाठी घातक आहे. मी आता विधानसभेला उभ राहणार नाही” असं या नेत्याने म्हटलं आहे. मराठवाड्यातील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी हे विधान केलय. अब्दुल सत्तार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळालेली नाही. याआधी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. अब्दुल सत्तार यांनी सरकार स्थापनेच्यावेळी मंत्रिपद मिळवण्याचे जोरदार प्रयत्न केले होते. पण यावेळी मराठवाड्यातून शिवसेना शिंदे गटाने संजय शिरसाट यांनी मंत्री बनवलं आहे.
“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले फक्त 208 मतांनी निवडून आले. मुख्यमंत्री बनणाऱ्या लोकांचे हे हाल आहेत. सध्या जे राजकारण चालू आहे, ते भविष्यासाठी घातक आहे. मराठवाडा सिल्लोडमधील माझी ही शेवटची निवडणूक होती. कोणी काही माझं वाकडं करु शकत नाही. मी, माझ्या मुलाला सांगितलय, तुला लढायचं असेल तर लढ बाबा” असं अब्दुल सत्तार बोलले. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
‘मी पुन्हा येईन…’
नवीन वर्षाच्या दुसऱ्यादिवशी अब्दुल सत्तार यांनी ‘मी पुन्हा येईन…’ असं वक्तव्य केलं होतं. अडीच वर्षानंतर आपण पुन्हा मंत्रिमंडळात असणार तसचंएकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास आहे, तोपर्यंत शिवसेनेत असणार आहे, असं सुद्धा ते म्हणाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी मी पुन्हा येईन याचा आशावाद व्यक्त केला होता.
पक्ष सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणालेले?
मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज आहेत, पक्ष सोडणार आहेत, अशा चर्चा सुरु होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी “जो पर्यंत एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे. तोपर्यंत मी त्यांच्या सोबत आहे. ज्या दिवशी त्यांचा माझ्यावर विश्वास नसेल त्या दिवशी तुम्ही म्हणाल तो निर्णय मी घेईन” असं अब्दुल सत्तार म्हणाले. परंतु शिंदे साहेबांचा विश्वास असेपर्यंत परिवाराचा सदस्य म्हणून काम करणार आहे.