सोनिया गांधी: आव्हान पेलणाऱ्या नेत्या ते आव्हानांचा सामना करणाऱ्या नेत्या

| Updated on: Dec 09, 2020 | 12:25 PM

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज वयाच्या 74व्या वर्षात पदार्पण करत आहेत. काँग्रेसच्या सर्वाधिक काळ अध्यक्षा राहिलेल्या सोनिया गांधी यांनी पहिल्यांदा काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारताच जनाधार गमावत चाललेल्या काँग्रेसला नवसंजीवनी दिली. (Sonia Gandhi, longest serving Congress president in indian history)

सोनिया गांधी: आव्हान पेलणाऱ्या नेत्या ते आव्हानांचा सामना करणाऱ्या नेत्या
Follow us on

नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज वयाच्या 74व्या वर्षात पदार्पण करत आहेत. काँग्रेसच्या सर्वाधिक काळ अध्यक्षा राहिलेल्या सोनिया गांधी यांनी पहिल्यांदा काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारताच जनाधार गमावत चाललेल्या काँग्रेसला नवसंजीवनी दिली. सर्व आव्हानांचा सामना करून त्यांनी काँग्रेसला पुन्हा उभं केलं. आजही काँग्रेसची संपूर्ण देशातून पिछेहाट झालेली आहे. काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाताला रोखू शकेल असा चेहरा काँग्रेसमध्ये नाहीये. अशा वेळी वयाच्या 74व्या वर्षातही काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी आव्हानांचा सामना करताना दिसत आहेत. आव्हान पेलणाऱ्या नेत्या ते आव्हानांचा सामना करणाऱ्या नेत्या, असा त्यांचा उलटा राजकीय प्रवास सुरू झाला आहे. जाणून घेऊया त्याबद्दल. (Sonia Gandhi, longest serving Congress president in indian history)

राजकारणातील प्रवेश

सोनिया गांधी यांनी देशाच्या राजकारणात 22 वर्षांपूर्वी पाऊल ठेवले. भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या जोडीने भारतीय राजकारणात दबदबा निर्माण केलेला असतानाच सोनिया यांचा राजकारणात प्रवेश झाला. एकीकडे वाजपेयी-आडवाणींचा दबदबा, तिसऱ्या आघाडीचा देशभरातील वाढता जनाधार आणि दुसरीकडे काँग्रेसला लागलेली घरघर अशा आव्हानात्मक परिस्थितीत सोनिया यांनी काँग्रेसची कमान हाती घेतली आणि काँग्रेसला नवसंजीवनी दिली. गेल्या दोन दशकांपासून त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. तब्बल 19 वर्षे त्या या पदावर आहेत. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर त्या पुन्हा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा झाल्या.

सोनिया गांधींचा मास्टरस्ट्रोक

राजकीय कारकिर्दीच्या पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी त्यांच्या नेतृत्वाची जादू दाखवून दिली आहे. आता राजकारणाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्या नाईट वॉचमनची भूमिका बजावत आहेत. त्या 1998 ते 2017 पर्यंत पक्षाच्या अध्यक्षा राहिल्या. 2004मध्ये त्यांनी पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांच्या सभांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद आणि ग्रामीण भागातील त्यांची वाढती लोकप्रियता यामुळे त्यांनी भाजपला पराभूत केलं. वाजपेयींनी सहा वर्षे केलेली मेहनत, शायनिंग इंडिया आणि भाजपच्या फिल गुडच्या घोषणाही सोनिया गांधींच्या झंझावातापुढे फिक्या पडल्या. सोनिया यांच्या झंझावाती प्रचारामुळे काँग्रेस पुन्हा सत्तेत आला. त्यानंतर त्यांनी स्वत: पंतप्रधान बनण्यास नकार देत मनमोहन सिंग यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे दिली. सोनिया गांधी यांचा हा निर्णय भारतीय राजकारणातील मास्टरस्ट्रोक असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात.

राजकारणात यायचं नव्हतं

1991मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी सोनिया गांधी राजकारणात यायला तयार नव्हत्या. मात्र, हळूहळू त्यांनी राजकारणात लक्ष घालायला सुरुवात केली. सोनिया यांनी राजकारणात यावं म्हणून त्यांना पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांना गळ घातली होती. त्या सक्रिय राजकारणात आल्या नाही तर काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला जाईल. त्यामुळे भाजपचा विस्तार होईल, असं माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. (Sonia Gandhi, longest serving Congress president in indian history)

1997मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं. या अधिवेशनाला सोनिया गांधी पहिल्यांदा उपस्थित राहिल्या. त्यांनी पद घेण्याऐवजी पक्षासाठी प्रचार करण्यास सुरुवात केली. 1998मध्ये पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी काँग्रेसला वाढवण्यावर भर दिला. त्यांना चांगलं हिंदी बोलता येत नव्हतं. तसेच राजकीय डावपेचही त्यांना माहीत नव्हते. त्यानंतरही त्यांनी पक्षावर आपली पकड कायम ठेवली. सोनिया यांच्या नेतृत्वात पक्षाने 1999ची लोकसभा निवडणूक लढली. मात्र, पक्षाला म्हणावं तसं यश आलं नाही. या निवडणुकीत भाजपला कारगिल युद्ध आणि पोखरण अणू स्फोटाचा फायदा मिळाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

… आणि काँग्रेस सत्तेत आली

2004 ची लोकसभा निवडणुका येईपर्यंत सोनिया गांधी यांना राजकारणातील सर्व आडाखे माहीत झाले होते. त्यांनी भाषेवरही बऱ्यापैकी प्रभुत्त्व मिळवलं होतं. भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी सोनिया गांधी यांनी आघाडीच्या राजकारणावर जोर दिला. आपल्या विचारांशी मिळत्या जुळत्या पक्षांची त्यांनी मोट बांधली आणि भाजपच्या विरोधात उभ्या ठाकल्या. 2004च्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसला आणि पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत आली. (Sonia Gandhi, longest serving Congress president in indian history)

यूपीएच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. धोरणात्मक निर्णय घेताना अधिकारावर आधारित धोरणं बनविण्यावर त्यांनी भर दिला. काँग्रेसच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात माहितीचा अधिकार, रोजगाराचा अधिकार, वनाधिकार, भोजनाचा अधिकार, योग्य भरपाईचा अधिकार आणि पुनर्वसनाचा अधिकार देण्याचं काम त्यांच्या कार्यकाळातच झाला. सोनिया गांधी राजकारणात येण्यापूर्वी उत्तर प्रदेशात काँग्रेसचं नामोनिशाण मिटलं होतं. राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशातही काँग्रेसला सत्तेतून बाहेर जावं लागलं होतं. सोनिया गांधी यांनी ही सर्व आव्हाने स्वीकारून या राज्यांमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला सत्तेत आणलं. त्यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. राज्यांमध्ये काँग्रेसचं मजबूत नेतृत्वही दिलं. दिल्लीत शीला दीक्षित, हरियाणात भूपेंद्र सिंह हुड्डा, राजस्थानात अशोक गेहलोत आणि आंध्रप्रदेशात राजशेखर रेड्डी हे त्याचं उत्तम उदाहरणं आहेत.

राहुल गांधींचं अपयश

सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचं नेतृत्व सांभाळलं. पण मोदींची लाट, भाजपचा आक्रमक प्रचार आणि भाजपकडून सोशल मीडियाचा केला जाणारा वापर याच्यासमोर राहुल गांधी यांचं नेतृत्व टिकू शकलं नाही. मोदींची विश्वासहार्यता, त्यांचं वक्तृत्व आणि काँग्रेसच्या राजवटीतील भ्रष्टाचार यामुळे काँग्रेसला उभं राहता आलं नाही. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना पक्षाचं अध्यक्षपद सोडावं लागलं. त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींकडेच पुन्हा पक्षाची धुरा आली असून काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं ठाकलं आहे. (Sonia Gandhi, longest serving Congress president in indian history)

 

संबंधित बातम्या:

शरद पवार, राहुल गांधींसह विरोधीपक्षांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

दिल्ली हिंसाचार सुनियोजित कट, अमित शाहांनी राजीनामा द्यावा, मोदी-केजरीवालांना 5 प्रश्न : सोनिया गांधी

(Sonia Gandhi, longest serving Congress president in indian history)