औरंगाबाद : मंदिर आणि मशिदीवरुन औरंगाबादमध्ये सध्या धार्मिक आणि राजकीय वातावरण तापवण्यात आलं आहे (Aurangabad Political Happening). आधी मंदिरं उघडण्यासाठी आणि आता मशिदीसाठी एमआयएम आंदोलनासाठी पुढे आली आहे. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी पुन्हा एकदा शांत केलं. तर शिवसेनेनं जलील यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
मंदिरं उघडण्यासाठी पुढे सरसावलेली एमआयएम मागे हटली. आता मशिदीत नमाज पठण करण्यावर ठाम राहिलेले एमआयएमचे खासदार इम्तियाज जलीलही पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर शांत झाले.
हेही वाचा : इम्तियाज जलील हे सातत्याने परिस्थिती बिघडवतात, त्यांच्यावर कडक कारवाई करा : चंद्रकांत खैरे
इम्तियाज जलील बुधवारी (2 सप्टेंबर) दुपारी 2 वाजता शहागंज इथल्या मशिदीत नमाज अदा करणारच, यावर ठाम होते. शिवसेनेला आव्हान देऊन इम्तियाज जलील नमाज अदा करण्यासाठी निघाले खरे, पण रस्त्यातच पोलिसांचा फौजफाट तैनात होता. पोलिसांनी जलिल यांची वाट रोखली. त्यांना ताब्यात घेतलं. पोलीस आयुक्त कार्यालयात नेऊन काही वेळाने पोलिसांनी जलील यांची सुटकाही केली. पण सुटकेनंतरही जलील धार्मिक स्थळांसाठी आंदोलन करण्यावर ठाम आहेत.
इकडे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंना पुन्हा एकदा जलिल यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली. आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका असल्यानं हिंदू-मुस्लिम सुरु केल्याचा घणाघात खैरेंनी केला आहे.
औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील खासदार झाल्यापासूनच एमआयएम आणि शिवसेनेत टशन सुरु आहे. त्यातच अचानक मंदिरे सुरु करण्यासाठी एमआयएम पुढे आल्याने सारेच चकित झाले आहेत. मंदिरे आणि आणि धार्मिक स्थळांशेजारील आर्थिक चक्र सुरु करणे हे ठिक आहे. पण औरंगाबादमधील आगामी महापालिका निवडणुकीमुळे अशा राजकीय कुरघोळ्या सुरु झाल्यात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
संबंधित बातम्या :
खासदार इम्तियाज जलील मशिद नमाज अदा करण्यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात