मुंबई : मागील जवळपास चार महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (ST Workers Agitation) आज वेगळं वळण मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इतकंच नाही तर आंदोलकांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला आणि दगडंही फेकले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ सिल्व्हर ओकवर पोहोचले आणि आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान, या प्रकारानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाची चौकशी करुन कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय.
पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या आंदोलनानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. एसटी कर्मऱ्यांना कुणी भडकावण्याचा प्रयत्न करतोय. कर्मचाऱ्यांनी कुण्याच्याही बोलण्यात येऊ नये. त्यांच्यावरील कारवाई आम्ही मागे घेतली आहे. एसटी सुरळीत सुरु व्हावी हे सर्वांसाठीच चांगलं आहे. आजच्या घटनेची चौकशी होऊन कारवाई होईल. एसटी तोट्यात असूनही आम्ही कारवाई केली नाही. एसटी कर्मचाऱ्यांवर आम्ही मेस्मा लागू दिला नाही. वारंवार जनतेला वेठीला धरण्याचं काम झालं, असं परब म्हणाले.
त्याचबरोबर आयच्या घटनेवरुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, ती चांगली आहे. गृहमंत्री चौकशी करतील आणि कारवाई होईल. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की कामावर रुजू व्हा. सदावर्ते की कोर्ट, कुणाचं ऐकायचं ते कर्मचाऱ्यांनी ठरवावं. 22 तारखेपर्यंत कामावर यावं, त्यानंतर मात्र कारवाई करु, असा इशाराही परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलाय.
शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर आदित्य ठाकरे तातडीने पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. काही वेळ पवारांशी चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरे बाहेर पडले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना विरोधकांना इशारा दिलाय. ‘महाराष्ट्राचं राजकारण कधीही इतकं घाणेरडं झालं नव्हतं. असं कुणाच्याही घरावर आंदोलन झालं नव्हतं. या संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी होईल आणि कडक कारवाई केली जाईल’, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांवर कारवाई होणार हे स्पष्ट केलंय.
इतर बातम्या :