तुमचं वकिलपत्रं आज काढून घेतलं एस.टी.संघटनांनी, सदावर्ते म्हणाले, गुजरले ते गुजरले !

| Updated on: Jan 10, 2022 | 5:26 PM

कष्टकऱ्यांसमोर नतमस्तक होऊन विलीनीकरण द्यावं. सरकारची हीच एकमेव भूमिका असली पाहिजे. कामगारांच्या मृत्यूला आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार होते. आता शरद पवारही जबाबदार असतील. तशी नोंद आता यापुढे केली जाईल, अशा शब्दात अॅड. सदावर्ते यांनी शरद पवार आणि अनिल परब यांना इशारा दिलाय.

तुमचं वकिलपत्रं आज काढून घेतलं एस.टी.संघटनांनी, सदावर्ते म्हणाले, गुजरले ते गुजरले !
ॲड. गुणरत्न सदावर्ते
Follow us on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन (ST Workers Strike) राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर तुमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करु, असं आश्वासनही यावेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आलं. तसंच एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अजय गुजर यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांचं वकिलपत्र काढून घेतल्याची घोषणा केली. त्यावर सदावर्ते यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘मी 75 हजार लोकांचा वकील आहे. ज्या युनियन होत्या त्या बाद झालेल्या, गुजरलेल्या युनियन होत्या. त्या युनियनकडे एक टक्काही कष्टकरी नाही आणि मान्यता रद्द झालेल्या आहेत. शरद पवारांच्या युनियनची मान्यता रद्द, त्यांचीही मान्यता रद्द. अशा मान्यता रद्द झालेल्या लोकांवर बोलून वेळ वाया घालवण्यापेक्षा कष्टकरी एकवटला आहे. तो भारत माता की जय म्हणतोय. जय श्रीराम म्हणतोय. जय भीम म्हणतोय. आता शरद पवार यांच्या वक्तव्याला वजन नाही. म्हणून मी आज सांगत आहे की कष्टकऱ्यांसमोर नतमस्तक होऊन विलीनीकरण द्यावं. सरकारची हीच एकमेव भूमिका असली पाहिजे. कामगारांच्या मृत्यूला आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार होते. आता शरद पवारही जबाबदार असतील. तशी नोंद आता यापुढे केली जाईल’, अशा शब्दात अॅड. सदावर्ते यांनी शरद पवार आणि अनिल परब यांना इशारा दिलाय.

‘मृत कर्मचाऱ्यांबद्दल पवारांनी ब्र देखील काढला नाही’

आजची शरद पवार आणि अनिल परब यांची बैठक अत्यंत लाजीरवाणी होती. ज्या 67 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबाबत शरद पवारांनी ब्र देखील काढला नाही. ते खरं आहे की बारामतीच्या कष्टकऱ्यांनी ठराव घेऊन, फ्लेक्स लावून जाहीर केलं होतं की कामगारांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी नाहीत. आणि ते पवारांनी आज कृतीत आणलं. शरद पवार हे एसटी महामंडळाकडे एखाद्या आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर बोलावसं वाटलं नाही. त्यामुळे ते कर्मचाऱ्यांच्या जीवाचा खेळ समजत आहेत. यावर महाराष्ट्र प्रश्न विचारत राहणार, असंही सदावर्ते यावेळी म्हणाले.

बैठकीत काय झालं?

सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा अनिल परब, शरद पवार आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत झाली. या एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत संपावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेनंतर कृती समितीला आश्वस्त करण्यात आलं. सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असून त्यासोबत आता एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीन कामावर रुजू व्हाव, असं कळकळीचं आवाहन करण्यात आलंय. एकूण 22 एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.

इतर बातम्या :

ST Strike | राजकीय पक्षांमुळेच हे आंदोलन पेटलं का, चिघळलं का? पवार म्हणाले, मला राजकारण करायचं नाही

Sharad Pawar | एस.टी.कर्मचाऱ्यांबाबत आजच सरकार का सकारात्मक झालं? पवार म्हणाले, पॉईंट असाय…