विलिनीकरणाचा मुद्दा कसा सुटणार? परब म्हणाले, चर्चा हाच एकमेव मार्ग; पडळकर, खोतांच्या भूमिकेवर बोट

| Updated on: Nov 16, 2021 | 2:35 PM

पडळकर आणि खोत यांच्याशी दोन वेळा बोललो आहेत. त्यांच्यासमोर सरकारचे प्रस्ताव ठेवले आहेत. ते एसटी कर्मचाऱ्यांशी बोलून पुन्हा येतो म्हणून गेले आहेत. कदाचित कामगारांना समजावण्यात ते कमी पडले असतील. नाहीतर कामगार त्यांचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील. मात्र, सर्वांसाठी चर्चेची दारं खुली आहेत. कुणीही आमच्याकडे चर्चेसाठी यावं, असं आवाहन परब यांनी केलंय.

विलिनीकरणाचा मुद्दा कसा सुटणार? परब म्हणाले, चर्चा हाच एकमेव मार्ग; पडळकर, खोतांच्या भूमिकेवर बोट
गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, अनिल परब
Follow us on

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत यांच्यावर निशाणा साधलाय. (Anil Parab criticizes Gopichand Padalkar and Sadabhau Khot over ST workers’ agitation)

अनिल परब माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी पडळकर आणि खोत यांच्याशी दोन वेळा बोललो आहेत. त्यांच्यासमोर सरकारचे प्रस्ताव ठेवले आहेत. ते एसटी कर्मचाऱ्यांशी बोलून पुन्हा येतो म्हणून गेले आहेत. कदाचित कामगारांना समजावण्यात ते कमी पडले असतील. नाहीतर कामगार त्यांचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील. मात्र, सर्वांसाठी चर्चेची दारं खुली आहेत. कुणीही आमच्याकडे चर्चेसाठी यावं, असं आवाहन परब यांनी केलंय.

उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची आज बैठक

दरम्यान, एसटी कमर्चाऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची आज संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनाही बोलावल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना काय देता येऊ शकतं, याबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं परब यांनी सांगितलं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहन परब यांनी पुन्हा एकदा केलं आहे.

गोपीचंद पडळकरांचा पुन्हा घणाघात

राज्यातील महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं आहे. काळ्या पायाचं हे सरकार आहे. अनेक संकटाच्या काळात या सरकारने काहीही मदत केली नाही. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्या ऐकून घ्याव्या. त्यांना काय देता येईल, काय देता येणार नाही याबाबतही चर्चा करावी. अन्यथा हेच एसटी कर्मचारी तुमचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिलाय.

रिवहन विभागाच्या सचिवांना काळे फासण्याचा इशारा

परिवहन खात्याचे सचिव हे परदेशात जातातच कसे? गेल्या सात दिवसांपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आणि हे परिवहन सचिव परदेशात जातात. त्यांची चौकशी झाली पाहिजे. ते मंत्रालयात आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासणार, अशी आक्रमक भूमिका पडळकर यांनी घेतलीय. तसंच परिवहन विभागाचे MD शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलाय. त्या पार्श्वभूमीवर उद्या प्रवीण दरेकर हे शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी असतील असं पडळकर यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

कोल्हापुरात पुन्हा एकदा रंगणार महाडिक विरुद्ध पाटील सामना! भाजपकडून अमल महाडिक रिंगणात

कोल्हापुरात एमडी ड्रग्सचा कोट्यवधीचा साठा जप्त! फार्महाऊसवर सुरु होता कारखाना, एकाला अटक

Anil Parab criticizes Gopichand Padalkar and Sadabhau Khot over ST workers’ agitation