मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता आता निर्माण झालीय. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येनं जमले आहेत. या आंदोलनात आता भाजपनं उडी घेतलीय. आझाद मैदानात जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. (Praveen Darekar criticizes Transport Minister Anil Parab on the issue of ST workers’ agitation)
किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून जायला नकोत. परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? असा खोचक सवाल करत दरेकर यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केलीय. सर्व एसटी कर्मचारी संघटनांना आवाहन आहे, तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका. कर्मचाऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाले आहात. आता कर्मचाऱ्यांचा विचार करा. तुम्ही एसीत बसा पण आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना बसायला तरी व्यवस्थित जागा द्या, अशी खोचक टीकाही दरेकर यांनी केलीय. त्याचबरोबर मंत्रालयात बसलेल्यांना अजूनही जाग येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी 100 वेळा उंबरठे झिजवायला तयार आहे. न्याय मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिलाय.
संकटाच्या काळात एसटी कर्मचारी तुम्हाला चालतो. पण विलिनीकरणाचा मुद्दा आला तेव्हा अवमान याचिका दाखल करता. कर्मचारी संकटात असताना तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. मी इथे विरोधी पक्षनेता म्हणून आलेलो नाही. एसा एसटी कर्मचाऱ्यांचा मुलगा म्हणून तुमच्यासमोर आलोय. मला तुमचं दु:ख माहिती आहे, अशी खंत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलीय. त्यावेळी दरेकर भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. इतकंच नाही तर विलिनीकरणाचा निर्णय घ्या आणि मगच चर्चेला या, असं आवाहन दरेकर यांनी यावेळी राज्य सरकारला केलंय.
राज्य सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली. जर दिवाळी गोड केली तर आत्महत्या का झाल्या? असा सवाल पडळकर यांनी केलाय. 35 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. हे तुमचं आंदोलन आहे, पण जबाबदारी आमची आहे. माणुसकीच्या हेतुनं आम्ही तुमच्यासोबत आहेत. सरकारकडे खायला पैसे आहेत, गरीबांना द्यायला नाहीत. त्यामुळे आता मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, अशी घोषणाच पडळकर यांनी केलीय. आम्ही तुमच्यासोबत इथेच झोपणार. बायका-मुलांना बोलावून घ्या. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिलाय.
इतर बातम्या :
आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
Praveen Darekar criticizes Transport Minister Anil Parab on the issue of ST workers’ agitation