मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी राज्यात सर्वत्र एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावरही गेल्या चार दिवसांपासून बेमुदत संप सुरु आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत आझाद मैदानात ठिय्या मांडून आहेत. अशावेळी राज्य सरकारनेही आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कालपर्यंत 2 हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलीय. तसंच ही कारवाई यापुढे अधिक कडक केली जाईल, असा सूचक इशाराही परब यांनी दिलाय. (Transport Minister Anil Parab’s warning to agitating ST workers)
दरम्यान, एसटी कामगार कामावर परतले नाहीत तर सरकार वेगळा म्हणजेच नव्या भरती प्रक्रियेचा विचार करणार का? असा सवाल अनिल परब यांना विचारण्यात आला. त्यावेळी परब यांनी सूचक उत्तर दिलंय. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि पवाशांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे सरकार सर्वच पातळ्यांवर विचार करत आहे. एसटी कामगार कामावर आले नाहीत तर आम्ही अन्य पर्यायांचा विचार करु, असं अनिल परब म्हणाले. कालपर्यंत 2 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी केलाय.
भाजप आंदोलन भरकटवायचं काम करत आहे. माझ्यावर आरोप केले तरी चालेल. चौकशी करा. चौकशीत दोषी सिद्ध झालो तर फाशी द्या. पण कामगारांचं नुकसान करू नका. त्यांनी चुकीची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे भाजप कामगारांना भडकवून आंदोलन चिघळवत आहे, असं सांगतानाच नितेश राणेचे आरोप आम्ही मोजत नाही. कोण नितेश राणे. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची त्यांची पात्रता आहे का. त्यांना आम्ही किंमत देत नाही, असं ते म्हणाले.
अनेक कर्मचारी कामावर येत आहेत. काल सांगितलं होतं की कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल आणि जे अडवणूक करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या कमिटीसमोर जावं आणि म्हणणं मांडावं. 12 आठवड्याच्या कालावधीत समितीचा जो अहवाल येईल तो आम्हाला आणि कर्मचाऱ्यांनाही मान्य असेल. आपण कामावर जा, कामावर गेलात तर आपलं नुकसान होणार नाही. राजकीय पक्ष राजकीय पोळ्या भाजतील, पण नुकसान आपल्याला सहन करावं लागेल, असं आवाहनही परब यांनी केलं.
इतर बातम्या :
Transport Minister Anil Parab’s warning to agitating ST workers