चंद्रपूर : “शिवसेनेचा त्याग खूप मोठा आहे. शिवसेनेने 30 वर्षांचा जुना मित्र सोडला (Sudhir Mungantiwar on Saamna editorial), हा किती मोठा त्याग आहे. शिवसेनेला पदाचा मोह नाही, हे खरं आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली, असं म्हणणं योग्य नाही. शिवसेनेने भाजपची साथ सोडली कारण त्यांनी ‘मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन’, असं वचन दिलं होतं. हे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी भाजपच्या मैत्रीचा त्याग केला”, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत (Sudhir Mungantiwar on Saamna editorial).
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला. त्याचबरोबर “शिवसेनेचा त्याग मोलाचा आहे हे विसरता येणार नाही”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. याच गोष्टीचा धागा पकडत सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली.
“‘समाना’ अग्रलेखात काँग्रेसला ज्या काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सूचना केल्या आहेत त्या सूचना काँग्रेसने समजून घेतल्या पाहिजेत. काँग्रेस फार अॅडजस्टमेंट करणारा पक्ष आहे. तुम्ही त्यांना राज्यसभेत जागा द्या किंवा नका देऊ, विधानसभेत जागा द्या किंवा नका देऊ. काँग्रेस शिवसेनेनेला कितीही धमक्या देत असेल तरी शिवसेनेच्या सत्तेला सोडण्याची क्षमता ही काँग्रेसमध्ये असू शकत नाही”, असा चिमटा सुधीर मुनगंटीवार यांनी काढला.
“काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते आणि सत्ता कोणाला नको, असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये” अशा शब्दात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर भाष्य करण्यात आले आहे, तर भाजपला अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला आहे.
“काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे” असेही अग्रलेखात म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
Saamana on Congress | खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, ‘सामना’तून काँग्रेसला चिमटे