मुंबईः राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या(Presidential Election) संदर्भाने भाजप नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी उद्धव ठाकरे यांना फोन लावल्यानंतर सलाम वालेक्कुम असं म्हटल्याचा किस्सा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितला. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, तो अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. कोणताही विशाल हृदयाचा माणूस अशा प्रकारे भाष्य करू शकत नाही. राजकीय प्रथा परंपरेला सोडून उद्धव ठाकरेंनी केलेलं हे भाष्य अयोग्य असून याचा जनतेने निषेध केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. राजनाथ सिंह यांच्या ऑपरेटरला कदाचित मेहबुबा मुफ्तींना फोन लावायचा असेल, तो इकडे लागला, असं वक्तव्य राऊत यांनी केलं.
राजनाथ सिंहांबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘ ही एक सोशल मीडियाच्या नवीन पद्धत आहे. मुद्दाम असं बोलायचं सोशल मीडियामधून हे पाठवायचं. हे निंदनीय आहे. राजनाथ सिंहांसारख्या मोठ्या नेत्यांच्या संदर्भात अशी दंतकथा करणे चुकीचं आहे. मी त्या संदर्भात माहिती घेतली. ते बैठकीत असल्याने प्रत्यक्ष माझी त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. पण मी त्यांच्या कार्यातून माहिती घेतली, तेव्हा साधारणतः राजनाथ सिंग अशा पद्धतीने कधी वक्तव्य करू शकत नाहीत. अमित शहांच्या बाबतीत पण असाच अडीच वर्ष मुख्यमंत्री करणार असा असत्य कथन केलं होतं.. आधी म्हणाले होते की, सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार आणि मग स्वतःच मुख्यमंत्री झाले.. त्यांचं हे वक्तव्य अत्यंत अशोभनीय वक्तव्य आहे, कुणीही असं वक्तव्य करू नये, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राजनाथ सिंह यांच्या ऑपरेटरला कदाचित मेहबुबा मुफ्तींना फोन लावायचा असेल. कारण त्या त्यांच्या सहकारी होत्या. चुकून ऑपरेटरने उद्धव ठाकरेंना फोन लावला असेल. कारण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे तर ते खरंच असणार…