वर्धा : औरंगाबाद नामकरणाचा मुद्दा सध्या प्रचंड तापला आहे (Sudhir Mungantiwar slams Shiv Sena). काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामकरणाला विरोध केला आहे. त्यांच्या या विरोधावरुन भाजपने सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे. “बाळासाहेब थोरातांनी स्वतःचं नाव बदललं. विजय ऐवजी बाळासाहेब केलं. औरंगजेबाचं नाव तुम्हाला प्रिय असेल पण संभाजीनगरच्या जनतेला नाही. हिटलरचं चिन्ह जगात ठेवत नाही, मग या गाझीचं कशाला ठेवता?”, असा सवाल त्यांनी केला. वर्ध्यात ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना शिवसेनेवरही त्यांनी निशाणा साधला.
सुभाष देसाईंना प्रत्युत्तर
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भाजपच्या या टीकेला शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. सत्तेत असताना तुमचे मुख्यमंत्री पाच वर्ष झोपले होते का? असा सवाल सुभाष देसाई यांनी केला. त्यांच्या या प्रश्नाला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं (Sudhir Mungantiwar slams Shiv Sena).
“पाच वर्षे भाजप आणि शिवसेना दोघांचे सरकार होते. शिवसेनेचे नेते तेव्हा राजीनामा खिशात घेऊन फिरायचे. मग तेव्हा राजीनामा का नाही दिला? आपल्या मुद्द्यांसाठी का प्रयत्न केला नाही? का पाठपुरावा केला नाही? किती पत्र दिले?”, असे सवाल त्यांनी केले.
“कितीतरी वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं कपोलकल्पित वचन आठवणीत राहील. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी विरोध केला सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेले”, असं मुनगंटीवार म्हणाले.
“बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाबाबत 1988 मध्ये घोषणा केली होती. आता तुमहाला ठरवायचं आहे. आमची मदत पाहिजे असल्यास भाजप म्हणून आम्ही मदत करू. बैठक बोलवा. तुम्ही जेवढा वेळ म्हणाल तेवढा वेळ देऊ. प्रश्न शहराच्या नामकरणाचा नाही. यातील गंभीरता समजून घेतली पाहिजे. औरंगजेब आक्रमणकरी होता. तो स्वतःला गझी म्हणायचा”, असं मुनगंटीवार म्हणाले.
“बाळासाहेब ठाकरे यांचं आम्ही या औरंग्याची औलाद नाही, आम्ही संभाजीची औलाद आहो, हे वाक्य आहे. आता नाव काय द्यायचं ते सुभाष देसाईंना ठरवायचं आहे”, असंदेखील ते म्हणाले.
“औरंग्याने अत्याचार केले. सत्तेसाठी त्याचं नाव बदलायचं नसेल तर नका बदलू. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा भाजपनं पूर्ण करावी, अशी इच्छा असेल तर आम्ही तयार आहोत. तुम्हाला वारसा चालवायचा नसेल तर नका चालवू. आम्ही सोबत आहोत. तुम्ही बैठक घ्या आम्ही पूर्ण शक्तीने तुमच्यासोबत आहोत. तुम्ही जरी सत्तेसाठी दूर गेले असाल तरी प्रस्ताव आणा आम्ही पाठिंबा देऊ”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
संबंधित बातमी : मग तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का; सुभाष देसाईंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार