लोकसभा निवडणूक लढणारच, आता माघार नाही : सुजय विखे पाटील

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : लोकसभा निवडणूक लढण्याचा माझा निर्णय नक्की आहे. आता कुठलीही माघार घेणार नाही, असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यानच सुजय विखे पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत करुन, आपली भूमिका मांडली. भाजप प्रवेशावर सुजय विखे काय […]

लोकसभा निवडणूक लढणारच, आता माघार नाही : सुजय विखे पाटील
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणूक लढण्याचा माझा निर्णय नक्की आहे. आता कुठलीही माघार घेणार नाही, असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यानच सुजय विखे पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत करुन, आपली भूमिका मांडली.

भाजप प्रवेशावर सुजय विखे काय म्हणाले?

“भाजपमध्ये प्रवेशाचा प्रश्नच नाही. मला माहित नाही, ही माहिती कुठून येते. उद्या दिल्लीत काँग्रेसच्या जागावाटपाची चर्चा आहे. आघाडीचा अंतिम निर्णय होणार आहे. आघाडीचा काय निर्णय झालेला आहे, हे अजून स्पष्ट नाही.”, असे सुजय विखे पाटील म्हणाले. तसेच, गिरीश महाजन आणि माझे वडील चांगले मित्र आहेत. ते मला मुलासारखं मानतात, असे म्हणत सुजय विखेंनी महाजनांसोबतच्या हेलिकॉप्टर प्रवासावर प्रतिक्रिया दिली.

मी लोकसभा निवडणूक लढवणार, हे नक्की आहे. यात कुठलीही माघार नाही, असेही सुजय विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

सुजय विखे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील उद्या (11 मार्च) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिढा कायम असताना, सुजय विखे पाटील यांच्या राजकीय हालचाली आघाडीसाठी धक्का देणाऱ्या ठरत आहेत. आता सुजय विखेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्याने आघाडीला अहमदनगरमध्ये मोठा धक्का बसणार आहे.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे उपाध्यक्षपद आणि दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीही सुजय विखे पाटील यांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभा जागेसाठी सुजय विखे इच्छुक आहेत. मात्र, ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत असल्याने, सुजय विखे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपच्या दिशेने आपला प्रवास सुरु केला आहे.

UPDATE (6.30 PM) : सुजय विखेंचा भाजप प्रवेश निश्चित – सूत्र

येत्या 12 मार्च रोजी सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय विखे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दक्षिण नगरसाठी सुजय विखे इच्छुक

सुजय विखे पाटील हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा आघाडीच्या परंपरेनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला येते आणि राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही.

सुजय विखेंचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश?

दक्षिण नगरच्या लोकसभा जागेसाठी राष्ट्रवादी ठाम आहे. त्यामुळे आघाडीत ज्या दोन-तीन जागांबाबत अद्याप तिढा आहे, त्यात दक्षिण नगरच्या जागेचा समावेश आहे. किंबहुना, याच जागेवरुन सर्वाधिक तिढा आहे. त्यात थेट विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसचीही मोठी गोची झाली आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीही जागा सोडण्यास तयार नाही.