अहमदनगर : भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी अहमदनगरमधून 2 लाख 81 हजार 474 मतांनी विजय मिळवला. मात्र सुजय यांचा विजय मोदी लाट आणि धनशक्तीचा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार आणि आमदार संग्राम जगताप यांनी दिली. प्रचारासाठी आपल्याला अतिशय कमी वेळ मिळाला. कमी वेळ मिळूनही मतदारांनी आपल्याला भरघोस मतदान केलं, असं म्हणत मतदारांचे आभार संग्राम जगताप यांनी मानले. सुजय विखे यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावेत यासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.
नगरच्या लढतीला जुन्या इतिहासाची पार्श्वभूमी असल्यामुळे अत्यंत चुरशीली लढत होईल, असा अंदाज लावला जात होता. पण सुरुवातीपासूनच ही लढत एकतर्फी झाली. सुजय विखे यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत वाढतच गेली आणि त्यांनी पावणे तीन लाख मतांनी विजय मिळवला. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने काँग्रेससाठी नगरची जागा न सोडल्यामुळे सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपच्या तिकिटावर त्यांनी दणदणीत विजय मिळवला.
नगरच्या लढतीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः लक्ष घातलं होतं. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन करण्यासाठी त्यांची सभाही झाली. तर भाजपकडूनही ही लढत प्रतिष्ठेची करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभाही नगरमध्ये झाली होती. नाराज नेत्यांना मनवण्यात यश आल्याने भाजपने या मतदारसंघावर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं.
शरद पवारांच्या पाच सभा
शरद पवारांनी या मतदारसंघात तब्बल पाच सभा घेतल्या. तसेच काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मुलाच्या प्रचारासाठी अनेक बैठक घेतल्या. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. अहमदनगर दक्षिण मतदारसंघ हा खरा तर अघाडीचा बालेकिल्ला. सहकार साखर कारखानदारी, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था आणि सहकाराचा घट्ट जाळं या मतदारसंघात आहे. मात्र खासदार दिलीप गांधी यांनी गटबाजीचा फायदा घेत भाजपाचं खातं खोललं. गेल्या दोन टर्मपासासून त्यांनी खासदारकी भूषवली.
गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेवर ते तरंगले. मात्र यंदा त्यांची धोक्याची घंटा अनेक दिवसांपासून वाजत होती. शिवाय भाजपमध्येच गांधींना मोठा विरोध सुरू होता. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीचाच दिलीप गांधींना मोठा फटका बसला. अखेर दिलीप गांधींचा पत्ता कट करून राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा चिरंजीव सुजय विखेला भाजपने उमेदवारी दिली. तर शेवटपर्यंत राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडली नाही. त्यामुळे विखे आणि पवार संघर्ष पुन्हा एकदा दिसून आला.
राधाकृष्ण विखे पाटलांच्या गुप्त बैठकांचाही फायदा
अहमदनगर दक्षिण मतदारसंघाकडे सुरुवातीपासूनच राज्याचं लक्ष लागले होते. पवारांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घातल्याने, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील राज्याकडे लक्ष न देता, सुरुवातीला मुलासाठी गुप्त प्रचार केला. नंतर थेट भाजपच्या बैठकांमध्ये सहभाग घेतला. इथे पंतप्रधान मोदींची एक आणि मुख्यमंत्र्यांच्या 3 सभा झाल्या. इथे सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप अशी लढत असली तरी प्रतिष्ठा पवार-विखेंची पणाला लागली होती.