मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. कोण कुणाला भेटेल आणि सत्तेची समीकरणं बदलतील याचा काही अंदाज बांधणं सद्यस्थितीला अवघड होऊन बसलंय. त्यातच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेतलीय. त्यामुळे या भेटीसत्राने तर्कवितर्कांना उधाण आलंय. राजकीय विश्लेषकही या भेटींकडे बारकाईने पाहात आहेत. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी या भेटी म्हणजे एकाचवेळी महाविकासआघाडी पक्षांशी आणि भाजपशी चर्चा करुन सत्तेत राहण्याच्या कसरतीचा भाग असल्याचं मत व्यक्त केलंय (Sunjay Awate comment on political meeting of Sanjay Raut and Ashish Shelar).
संजय आवटे म्हणाले, प्रविण दरेकर आत्ता जे काही विधानं करत आहेत ते फार गोलमाल विधानं आहेत. मुळात प्रविण दरेकर यांना आत्ता काय सुरू आहे हेच माहिती नाही. समजा त्यांना काही माहिती असेल तरी ते त्यावर आत्ता काही बोलू शकत नाही. मुळात विधीमंडळाच्या अधिवेशनावर संजय राऊत आणि आशिष शेलार यांनी भेटण्याचं काही कारणच नाही. आशिष शेलार विधीमंडळात आहेत, पण संजय राऊतांचा विधीमंडळाशी काही संबंध नाही. म्हणूनच राऊत आणि शेलार भेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होतेय हे म्हणण्यात काही अर्थ नाही.”
“मला असं दिसतंय की आगामी काही दिवसांमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत आणि मागील काळातही काही घडामोडी घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरच या भेटी होत आहेत. यात संजय राऊत महत्त्वाचा दुवा आहेत. ते शरद पवारांना भेटत आहेत, आशिष शेलार यांनाही भेटत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत आहेत. यावरुन भाजपला महाविकासआघाडीचं सरकार बरखास्त करायचं आहे, पाडायचं आहे आणि आपलं नवं सरकार स्थापन करायचं आहे असं दिसतंय. दुसरीकडे महाविकासआघाडी सरकारमधील घटकपक्ष हे कारस्थान उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं संजय आवटे यांनी सांगितलं.
“या परिस्थितीत स्वेच्छेने कुणी भाजपसोबत जाईल असं नाहीये. संख्याबळ पाहता पूर्ण पक्ष भाजपसोबत केल्याशिवाय काही घडणार नाही. काही आमदार जाऊन उपयोग नाही. कुठलाही पक्ष स्वेच्छेने जाणार नाही. जो जाईल तो सक्तीने जाईल किंवा एका अर्थाने ब्लॅकमेलिंग झालं तरच जाऊ शकतो. अशावेळी त्या सगळ्या कारस्थानाला बळी पडायचं की त्याला तोंड द्यायचं अशा गोष्टी आहेत. आता कारस्थानाला बळी पडायचं नसेल तर तिन्ही घटकपक्षांनीही एकमेकांशी बोलावं लागेल. तसेच सक्तीने भाजपकडे जावं लागलं तर त्यांच्याशीही बोलावं लागेल, अशी कसरत शिवसेनेला करावी लागेल,” असंही निरिक्षण त्यांनी नमूद केलं.