शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?

| Updated on: Dec 15, 2023 | 2:57 PM

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या 31 डिसेंबरला अंतिम निकाल येईल, अशी आशा असताना आता नवी बातमी समोर आली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे गेल्या काही आठवड्यांपासून दररोज नियमित सुनावणी घेत आहेत. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यावर आली आहे. असं असताना राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने नार्वेकर यांच्या मागणीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?
Follow us on

प्रदीप कापसे, नवी दिल्ली | 15 डिसेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सुनावणी घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिशय वेगाने घडामोडी घडल्या. विधानसभा अध्यक्षांनी सलग काही आठवडे सुनावणी घेतली. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांची उलटसाक्ष नोंदवण्यात आली. या दरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खटके देखील उडाले. या सगळ्या घडामोडींनंतर सुनावणी अंतिम टप्प्यावर आली आहे. पण तरीदेखील 31 डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर करणं शक्य नसल्याची भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची होती. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यांच्या या मागणीवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने राहुल नार्वेकर यांना सुनाणीसाठी 10 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की विधानसभा अध्यक्षांचा सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न आहे. पण राहुल नार्वेकर यांची बाजू मांडणारे वकील तुषार मेहता यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. कोर्टाने तीन आठवड्यांचा वेळ दिला नाही. पण दहा दिवसांचा वेळ वाढवून दिला. त्याआधी शिवेसनेचा निर्णय राहुल नार्वेकर यांना निकाल द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या अर्जात स्पष्ट म्हटलं आहे की, मी निकाल 20 डिसेंबरला राखून ठेवणार आहे. पण मला तीन आठवडे वाढवून द्या. कारण मला जजमेंट लिहावा लागेल. त्यामुळे कोर्टाने सांगितलं की आम्ही तुम्हाला 10 जानेवारीपर्यंतचा वेळ देतो. ते राहुल नार्वेकर यांच्या वकिलांनी देखील मान्य केलं, असं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.

‘मला 2 लाख 71 हजार पानांचं वाचन करायचंय’

20 डिसेंबरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मला 2 लाख 71 हजार पानांचं वाचन करायचं आहे. त्यामुळे 30 डिसेंबरपर्यंतचा काळ कमी पडतोय. त्यामुळे आणखी तीन आठवडे द्या, असं राहुल नार्वेकर अर्जात म्हणाले होते. कोर्टाने त्यांची तीन आठवड्यांची मागणी मान्य केली नाही. पण 10 दिवसांची मुदत वाढवून दिली.