मुंबई : आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, मात्र केंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरून राज्यातील वातावरण बिघडवले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केला. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या. केवळ महिला घरात होत्या असं असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जावयावर घरात जाऊन कारवाई करण्यात आली हे चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणात, देशाच्या राजकारणात अशा प्रकाराला कधीच जागा नव्हती, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाविकास आघाडीचे काम आणि जनसामान्यांमध्ये महाविकास आघाडीबद्दल जे प्रेम आहे, ते गेल्या दीड वर्षात चांगल्या रितीने चाललेलं आहे. सर्व्हे देखील आमच्या बाजूने आहेत, राज्य सरकारची लोकप्रियता वाढत चालली आहे. दुसरं काही विषय नसल्यामुळे सत्तेचा गैरवापर केला जातोय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
या आधी अशाप्रकारचं दडपशाहीचं काम मी पाहिलेले नाही, असा यंत्रणेचा वापर मी केव्हाही पाहिलेला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. मात्र केंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरून राज्यातील वातावरण बिघडवले जात आहे. ईडी, सीबीआय हे सरकारी नियंत्रणात आहेत, त्यांच्या संघटनेतील माहिती लीक कशी होते ती कशी केली जाते? सुडाचं राजकारण कधी ऐकलेले नाही, महाराष्ट्रात हे राजकारण टिकणारं नाही, केंद्र सरकारची वागणूक अतिशय दुर्दैवी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देश चालायला हवा, ते महाराष्ट्रात होताना दिसत नाही. पण आम्ही याच्याविरोधात पूर्ण ताकतीने लढू, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
अनिल देशमुख यांचा जावई गौरव चतुर्वेदी यांना काल रात्री सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. सीबीआयने काही काळ चौकशी करुन त्यांची सुटका केली. देशमुखांचे जावई वरळीतील सुखदा या इमारतीमध्ये आले होते. त्यानंतर ते बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. अनिल देशमुख यांच्या वकील आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप केलाय. सीबीआयच्या या कारवाईवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.
संबंधित बातम्या
अनिल देशमुखांच्या जावयाची सीबीआयकडून चौकशी! महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका