बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवत, खासदारकीची हॅटट्रिकही साधली आहे. यंदा सुप्रिय सुळे यांनी भाजपच्या उमेदवार आणि रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना पराभूत केले. मात्र, कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांना टक्करही चांगली दिल्याचे चित्र आहे. विशेषत: दौंड आणि खडकवासल्यातून कांचन कुल आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, ज्या खडकवासल्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली, तिथेच सुप्रिया सुळे या मोठ्या फरकाने पिछाडीवर राहिल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार उभा केला नाही. मात्र, तरीही ‘मोदी-शाहमुक्त भारत’ अशी घोषणा देत राज ठाकरे यांनी पंतप्रधान भाजपविरोधात प्रचार केला. मात्र, राज ठाकरे यांच्या प्रचाराचा फारसा परिणाम राज्यात पाहायला मिळाला नाही.
वाचा : माझा वाघ गेला, ‘गोल्डमॅन’च्या आठवणीने राज ठाकरे गहिवरले!
पुण्यातील खडकवासला येथेही राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली होती. मात्र, इतर सभांप्रमाणेच खडकवासल्याची राज ठाकरेंची सभाही फ्लॉप झाल्याची पाहायला मिळाली. सुप्रिया सुळेंना मिळालेल्या मतांवरुन राज ठाकरेंच्या खडकवासल्याच्या सभेचा परिणाम शून्य झाल्याचे पाहायला मिळालं.
सुप्रिया सुळे यांना खडवासल्यात 81 हजार 579 मतं, तर कांचन कुल यांना 1 लाख 47 हजार 433 मतं मिळाली. म्हणजेच खडकवासल्यातून कांचन कुल या तब्बल 65 हजार 874 मतांनी आघाडीवर राहिल्या.
सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांना कुठून किती मतं?
दौंड
कांचन कुल – 90,789
सुप्रिया सुळे – 83,765
कांचन कुल आघाडी – 7,024
पुरंदर
कांचन कुल – 95,191
सुप्रिया सुळे – 1,04,872
सुप्रिया सुळे आघाडी – 9,682
इंदापूर
कांचन कुल – 51,285
सुप्रिया सुळे – 1,20,024
सुप्रिया सुळे आघाडी – 68,739
बारामती
कांचन कुल- 47,068
सुप्रिया सुळे – 1,74,986
सुप्रिया सुळे आघाडी – 1,27,928
भोर
कांचन कुल – 89894
सुप्रिया सुळे – 108863
सुप्रिया सुळे आघाडी – 18,969
खडकवासला
कांचन कुल – 1,47,433
सुप्रिया सुळे – 81,579
कांचन कुल आघाडी – 65,874
सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून विजय मिळवला. 1 लाख 52 हजार 429 मतांनी सुप्रिया सुळे यांनी कांचन कुल यांचा पराभव केला. गेल्यावेळीपेक्षा दुपटीहून अधिक फरकाने सुप्रिया सुळे विजयी झाल्या. त्यामुळे बारामतीत मोदीलाट चालली नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवाय, भाजपने बारामतीत सुप्रिया सुळे यांना परभातू करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर बारामतीत तळ ठोकून ठेवला होता. मात्र, तरीही सुप्रिया सुळे मोठ्या फरकाने विजयी झाल्या.