एक वादळ आलं… अदृश्य शक्तीने आमचं घर उद्ध्वस्त केलं; अखेर सुप्रिया सुळे यांची खदखद बाहेर

| Updated on: Aug 17, 2024 | 9:08 PM

लाडके बहिण योजना चांगली योजना आहे. मी तिचं स्वागत करते. सरकार किती वाईट असलं तरी. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत त्यांनी तातडीने बँकेत जा आणि ते पैसे काढा. कारण यांचा भरोसा नाही. यांचा एक आमदार म्हणतो मतदान केलं तर ठिक. नाहीतर डिसेंबरमध्ये पैसे देणार नाही. मात्र या आमदाराला हेच माहीत नाही की डिसेंबरमध्ये यांच सरकार नसणार, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

एक वादळ आलं... अदृश्य शक्तीने आमचं घर उद्ध्वस्त केलं; अखेर सुप्रिया सुळे यांची खदखद बाहेर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा राजकीय निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत फूट पडली. त्याचा परिणाम केवळ पक्षावर आणि राजकारणावरच झाला नाही तर कुटुंबातही त्यावरून कटुता आली. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षातील या घडामोडींवर भाष्य केलं. आमच्या आयुष्यात एक वादळ आलं आणि त्याने आमचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. कुटुंब म्हणजे पवार कुटुंब नाही, तर राष्ट्रवादी पक्ष हा आमचं कुटुंब आहे. ते उद्ध्वस्त झालं, अशी मनातील खदखद सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

खासदार सुप्रिया सुळे या आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. अमळनेरमध्ये बोलताना त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. या मतदारसंघातून पाच वर्षांपूर्वी एक आमदार तुम्ही निवडून दिला होता त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडत असतात. तशा माझ्या आयुष्यातही घडल्या आहेत. माझा काळ मी बदलू शकत नाही. आमच्या घरात मुलं आणि मुलींमध्ये कधी अंतर नव्हतं, अशा पुरोगामी कुटुंबामध्ये मी जन्माला आले आहे.

वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान करायचा, कधीकधी एक पाऊल मागे घेतलं. फार जबाबदाऱ्या घेतल्या नाही. वडिलांच्या जागेवर काम करायचा निर्णय झाला, असं सांगतानाच यानंतर आमच्या आयुष्यात एक वादळ आलं. एक अदृश्य शक्ती आली आणि अदृश्य शक्तीला आमचं सुख काय बघवलं गेले नाही आणि या अदृश्य शक्तीने आमचं घर उद्ध्वस्त केलं. घर म्हणजे पवार कुटुंब नाही, तर राष्ट्रवादी पक्ष उद्ध्वस्त करण्याचा पाप या अदृश्य शक्तीने केले आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

म्हणून मी लढत आहे

आमचा पक्ष उद्ध्वस्त झाला. त्यावेळी तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं? तुम्ही रडल्या असत्या की लढल्या असत्या? मला माझी भगिनी रडायला शिकवत नाही. लढायला शिकवते आणि म्हणून मी लढत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितलं.

मी कुणाची मिंधी नाही

आज माझ्यावर अनेक लोक टीका करतात. कारण मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमधले पैसे खाल्ले नाहीत. मी कुणाच्या पाच पैशाची मिंधी नाही. राजकारणात पैसे कमवायला नाही, तर काहीतरी बदल घडवायला आली आहे. राज्यात गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. ते आपल्याला बदलयाचं आहे, असंही त्या म्हणाल्या.

मी नाही घाबरत

त्यांना वाटतं पैसे वाटले की लोक विकत घेता येतात. पन्नास खोके आणि एकदम ओके. ते माझ्यावर टीका करू शकतात, त्यांच्या अधिकार आहे. मात्र मी टीका केली की ते मला भीती दाखवतात. मी नाही घाबरत. सत्यमेव जयते. कारण विजय हा सत्याचाच होत. सत्य परेशान हो सकता है. सत्य पराजित नही हो सकता, असंही त्या म्हणाल्या.