मुंबई: मनाजोगे खाते न मिळाल्याने शिंदे गटाचे (shinde government) मंत्री नाराज आहेत. शिवसेनेतून (shivsena) बंड करून आल्यानंतरही महत्त्वाचे खाते न मिळाल्याने या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यावरून विरोधकांनी शिंद-फडणवीस सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनीही या नाराज मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. आजकाल बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत. हे हस्यास्पद आहे, अशी खिल्ली सुप्रिया सुळे यांनी उडवली आहे. आजकाल नेत्यांचे मोबाईल नॉटरीचेबल येत आहेत. हे सुद्धा हस्यास्पद आहे. नेत्यांचा फोन सदैव रिचेबल असायला हवा. तुमच्याकडे ही काय मोबाईल नॉट रिचेबलवाली पद्धत सुरू झाली आहे, असं मला आजकाल दिल्लीवाले विचारत असतात, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
आपल्या राज्याला हे हॉटेल पॉलिटिक्स परवडणारे नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन हॉटेलमधे बसायचे आणि राज्याला वाऱ्यावर सोडायचे हे आपल्याला परवडणारे नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
महिलांना आरक्षण देणारं महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. शरद पवार यांनी महिला आरक्षण लागू केलं. राज्याच्या महिला धोरणाची माहिती पंतप्रधानांना द्यायला हवी. मोदींजीनी जी पंचसूत्री दिली त्यावर महाराष्ट्र अधीच काम करत आलेला आहे, असंही त्या म्हणाल्या.
यशवंतराव चव्हाणांपासून ते उद्धव ठकारेंपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं आहे. उद्धव ठाकरे पायउतार झाल्यानंतर आलेल्या सरकारने तर अजून कामच सुरू केलेले नाही. या सरकारकडून फक्त फोनवरून सुचना दिल्या जात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप झालं आहे. या खाते वाटपात शिंदे गटाला दुय्यम आणि भाजपकडे मलईदार तसेच महत्त्वाची खाती गेली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात भाजपने चांगली खाती आपल्या ताब्यात ठेवल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. शिवाय ठाकरे सरकारमध्ये ज्यांना अत्यंत महत्त्वाची खाती मिळाली होती. त्या मंत्र्यांना शिंदे सरकारमध्ये दुय्यम दर्जाची खाती मिळाली आहेत. तसेच ज्या मंत्र्यांवर आरोप आहेत, त्या मंत्र्यांना चांगली खाती मिळाल्यानेही शिंदे गटातील काही मंत्री नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी हा हल्लाबोल केला आहे.