सोलापूर : माझी शेवटची निवडणूक आहे. शेवटच्या निवडणुकीत मला शरद पवारांची साथ हवीय, असे भावनिक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. सोलापुरात आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या निर्धार मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेही उपस्थित होते.
काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे?
“शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांची मला साथ पाहिजे. शरद पवारांनी मला राजकारणात आणलं. मी अनेकवेळा निवडणुका लढविल्या. शरद पवारांची साथ सोडली नाही. मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे.”, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
मोदींनी देशाला कोठे नेऊन ठेवलय यावर न बोललेल बरं, असा टोला लगावत सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, “एखादा खासदार निवडून आला, तर त्याला परत बदलत नाहीत, मात्र सोलापूरमध्ये भाजपने उमेदवार बदलला.”
सभेला तुरळक गर्दी
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोलापुरातील निर्धार सभेला अत्यंत तुरळक गर्दी होती. स्वत: शरद पवार, सुशीलकुमार शिंदे व्यासपीठावर असतानाही समोर अनेक खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या भाषणासोबतच सभेची गर्दीही सोलापुरात चर्चेचा विषय ठरली.
कोण आहेत सुशीलकुमार शिंदे?
सुशीलकुमार शिंदे हे निष्ठावंत काँग्रेस नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही सुशीलकुमार शिंदे यांनी काम केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात पकडून सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणात पाय ठेवला. सुशीलकुमार शिंदेंनीही बऱ्याचदा पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांचेही आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.