मुंबई: उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. सुषमा अंधारे यांना त्रास देण्यासाठीच वाघमारे यांना शिंदे गटात प्रवेश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. वाघमारे यांनीही आपण सुषमा अंधारे यांची पोलखोल करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आपल्या लाडक्या लेकीला कबीराला उद्देशून एक पत्र लिहिलं. त्यात आपल्या राजकीय निर्णयावर भाष्य करतानाच राजकारणात उभं राहताना होणाऱ्या हल्ल्यांचाही उल्लेख केला. सुषमा अंधारे यांचं हे भावूक पत्रं व्हायरल झालं. त्यानंतर अंधारे यांच्या भावानेही भाचीला एक भावूक पत्र लिहून सुषमा अंधारे यांच्या जिद्दीचं वर्णन केलं आहे.
सुषमा अंधारे यांचे बंधू प्रा. शिवराज बांगर पाटील यांनी हे पत्रं लिहिलं आहे. बांगर पाटील हे बीड येथे राहतात. त्यांनी भाची कबीरा हिला उद्देशून हे पुस्तक लिहिलं आहे. आज तुझ्या आईवर वैयक्तिक हल्ले करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यांच्या भात्या मधील शेवटचे शस्त्र म्हणजे “तुझा बाप”. हेच अस्त्र या व्यवस्थेने खूप लवकर तिच्यावरती वापरलेय. तुझ्या बापालाही आम्ही जवळून ओळखतो. त्याची राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक उंची आम्हाला माहीत आहे, असं प्रा. शिवराज बांगर पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.
परंतु “केवळ सुषमा अंधारेचा पती” म्हणून त्यांना काल मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहण्याचा बहुमान मिळाला. तू एक विचार कर, आज जर तुझा बाबा सुषमा अंधारेंचा पती नसता आणि तो एखाद्या शेतामध्ये काम करणाऱ्या सामान्य भगिनीचा पती असता तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांने त्याला बोलावलं असतं का?, असा भावनिक सवालही त्यांनी या पत्रातून केला आहे.
प्रिय,
कबीरा सुषमा अंधारे हिस…..
बाळा मी ना तुझ्या आईच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ना तुझ्या आईचा. परंतु तुझी आई ज्या पद्धतीने एका नाकारलेल्या व्यवस्थेतून बाहेर पडून स्वतःचे व्यक्तिमत्व आणि अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे ही खरंच आम्हा भटक्याच्या लेकरासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मी तुझ्या आईच्या अनेक भूमिका पाहिल्या. तिने कधीच आपल्या तत्त्वासोबत तडजोड केलेली मला आजपर्यंत जाणवली नाही. ती शब्दात कुणाला सापडत नाही की सीबीआय, ed तिचं काय बिघडवू शकत नाही. बाबासाहेबांच्या विचाराची धगधगती मशाल घेऊन महाराष्ट्रातील राजकिय जळमट जाळण्यासाठी निघाली आहे….
ज्या ज्या वेळेला आमच्यासारखे चळवळीतील लोक अडचणीत आले तेव्हा ती आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आली आहे. आज तिच्यावर वैयक्तिक हल्ले करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यांच्या भात्या मधील शेवटचे शस्त्र म्हणजे “तुझा बाप”. हेच अस्त्र या व्यवस्थेने खूप लवकर तिच्यावरती वापरलेय.
तुझ्या बापालाही आम्ही जवळून ओळखतो. त्याची राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक उंची आम्हाला माहीत आहे. परंतु “केवळ सुषमा अंधारेचा पती” म्हणून काल मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहण्याचा बहुमान मिळाला.
तू एक विचार कर, आज जर तुझा बाबा सुषमा अंधारेचा पती नसता आणि तो एखाद्या शेतामध्ये काम करणाऱ्या सामान्य भगिनीचा पती असता तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांने त्याला बोलावलं असतं का?
आम्ही आनंदी असतो, कधी काळी ज्या जोडीदाराने आम्हाला नाकारलेले आहे आज तेच आमच्या यशाच्या कडेला धरून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहतात. आणि लोक त्यांना केवळ आमचे जोडीदार म्हणून जवळ करतात.
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला संपवण्यासाठी कुठलीच बाजू शिल्लक नसते. त्यावेळेला त्याच्या वैयक्तिक जीवनाचा, त्याच्या वैयक्तिक प्रश्नांचा बाजार हे राजकीय मंडळी मांडतात.
या सर्व घटना मी स्वत: सहन केल्या आहेत. आज ज्या धीराने आणि समर्थपणे तुझी आई सगळ्या गोष्टीला सामोरे जात आहे, निश्चितच बहीण म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे.
येणारा काळ हा जेवढा संधीचा आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त संकटांचा आहे. तुझ्या आईच्या आयुष्यातील शेवटचे सुख आणि दु:ख व्यक्त करण्याचे व्यासपीठ तू आहेस. ज्या कष्टाने तुला ती वाढवत आहे, उभी करत आहे याची जाणीव तुला असायला हवी म्हणून हा शब्द प्रपंच आहे.
बाकी तुझी आई एक “रणरागिणी आहे” या नथीमधून केलेल्या वाराला ती कधीच भीक घालणार नाही. तिच्या लढ्यामध्ये आमच्यासारखे पक्ष संघटना सर्व सोडून, लाखो भाऊ पाठिशी उभे आहेत. फक्त तू तिची काळजी घे, एवढीच तुझ्याकडून अपेक्षा.
तुझा मामा,
प्रा. शिवराज बांगर पाटील.
बीड…