शिवाजी पार्क मैदान: शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी हिंदुत्वाच्या (hindutva) मुद्द्यावरून आज शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा जेव्हा शिवसेना संपवण्याची भाषा करत होते. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात 40 बंडखोर उभे करण्यात आले होते. तेव्हा तुम्ही काय करत होता? रमेश लटके हा आपला भाऊ गेलाय. त्याची विधाव पत्नी लढतेय. तिच्याविरोधात तुम्ही भाजपला (bjp) साथ देत आहात आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारत आहात? असा सवाल करतानाच बीकेसीत इव्हेंट करणारे तुम्ही हिंदुत्व जपणार? तुमचं हिंदुत्व फक्त ईडीच्या कार्यालयात जागृत झालंय, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.
शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यातून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाची अक्षरश: पिसे काढली. ज्याला नांदायचंच नसतं त्यांना बारा मुद्दे असतात. तशी बारा कारणं यांनी सांगितली. ते म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी गेलो. हिंदुत्वासाठीच हे लोक गेले. हिंदुत्वासाठी चाललोय किरण पावसकरने म्हणावं? अजित पवारांनी विधान परिषदेचं चॉकलेट दिल्यावर सहा वर्ष तुम्ही राष्ट्रवादीत गेला. त्यावेळी पावसकर सहा वर्ष तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीवर टाकलं होतं? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यावरही टीका केली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सोनिया गांधींचा विचार ऐकायचा का? असं राणे म्हणाले. दहा वर्ष राणे सोनियांच्या मेहरबानीवर मंत्री झाले. आमदार झाले. त्यांचा मुलगाही आमदार झाला. त्यांनी सोनिया गांधींबद्दल बोलावं? असा हल्लाच त्यांनी राणेंवर चढवला.
हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं? सच्चा हिंदू होण्यासाठी इतर धर्माचा द्वेष केला पाहिजे हे हिंदुंच्या कोणत्या ग्रंथात म्हटलंय? तुम्हाला हिंदुत्व कळलं असतं, हे विश्वची माझं घरं ही संकल्पना कळली असती तर पुढे गेला असता. पण उद्धव ठाकरे हिंदुत्व घेऊन पुढे जात आहे. ही संकल्पना पुढे नेत आहेत, असं त्या म्हणाल्या.
तुम्ही खरंच हिंदुत्ववादी असाल तर प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे, अर्जुन खोतकर आणि आढळराव पाटलांचे मतदारसंघ भाजपला देऊन टाका. मग त्याग आणि हिंदुत्व कळेल, असं आव्हानच त्यांनी दिलं.
तुमचं हिंदुत्व फक्त अन् फक्त ईडीच्या कार्यालयात जागृत झालंय. तुमचं हिंदुत्वच नाहीये. शिवसेना विचार आहे. शिवसेना संपणारी नाही. शिवसेनेची पाळंमुळं म्हणजे हा लाखोचा जनसमुदाय आहे. पावसाळी भू छत्रांकडून शिवसेना संपेल अशी वल्गना करू नये, असंही त्या म्हणाल्या.