‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. अश्विनीला महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे. याची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली. साताऱ्यातील वाई इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्याला सुरुवात झाली. याच मेळाव्यात अश्विनीचा पक्षप्रवेश झाला. मेळाव्याला जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबूब शेख, बाळासाहेब पाटील हेदेखील उपस्थित होते.
याआधी अश्विनीला काही प्रचारसभांमध्ये पाहिलं गेलं होतं. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी वाई इथं झालेली सभा अश्विनीने गाजवली होती. राष्ट्रवादीच्या मंचावर दिसल्याने तिला काहींच्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. याविषयी एका मुलाखतीत अश्विनीने तिची बाजू स्पष्ट केली होती. “वाईपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या पसरणी गावात माझा जन्म झाला. या गावात माझ्या वडिलांनी राजकारणात पिढ्या घडवल्या आहेत. त्यामुळे ते माझ्या रक्तातच आहे. मी कॉलेजमध्ये असल्यापासून या सगळ्यात सक्रीय आहे. माझ्या वडिलांनी शरद पवारांना नेतृत्त्व म्हणून खूप आधीच स्वीकारलं होतं. आमच्या घरात जेवतानाही पवार साहेबांच्या कामाची चर्चा व्हायची.” भविष्यात मला राजकारणात काही काम करण्याची आणि मोठी जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच त्याचा विचार करेन, असं अश्विनीने म्हणून दाखवलं होतं.
अश्विनीने नाटक आणि मालिकांमध्ये काम केलंय. ‘अस्मिता’ या मालिकेतून ती प्रकाशझोतात आली. तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने साकारलेल्या ‘राणू आक्का’च्या भूमिकेला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. अश्विनी ‘रयतेचं स्वराज्य प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेअंतर्गतही अनेक सामाजिक कार्ये करत आहे. या संस्थेकडून कोरोना काळातही बरीच कामं झाली होती.