लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी निसटता पराभव झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी बाजी मारली. या निवडणुकीचा निकाल देताना घोटाळा झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. 4 जूनला संध्याकाळी उशिरा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला होता. ठाकरे गटाकडून वारंवार या निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेण्यात आला आहे. आज ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याच निवडणूक निकालावरुन वंदन सूर्यवंशी यांच्यावर टीका केली आहे.
अमोल किर्तीकर यांच्या मतमोजणीच सीसीटीव्ही फुटेज मिळत नाहीय, असं पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले की, “चोर असतो तो सीसीटीव्ही फुटेज गायब करतो. मतदान केंद्रातल्या अधिकारी वंदना सूर्यवंशी महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यांचा इतिहास तुम्ही पाहा. अमोल किर्तीकरांबाबत जो निर्णय झाला, मुख्यमंत्री शिंदेंच्या दबावात दिला. रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मोबाइल घेऊन आत फिरत होते. हा सर्व घोटाळा वंदना सूर्यवंशी यांनी केलाय. चार महिन्यात परिवर्तन होणार. त्यानंतर वंदन सूर्यवंशी कुठे जाणार?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.
‘मोहन भागवत मणिपूर, काश्मीरमध्ये गेलेत का?’
“वंदना सूर्यवंशी सर्वात भ्रष्ट अधिकारी आहेत. वंदना सूर्यवंशी कर्तव्याला जागलेल्या नाहीत. अमोल किर्तीकर विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही न्यायालयात जाणार” असं संजय राऊत म्हणाले. मणिपूरचा मुद्दा देखील त्यांनी मांडला. “मोहन भागवत मणिपूर, काश्मीरमध्ये गेलेत का? मोदी-शाह जात नसतील, तर भागवत यांनी तिथे जावं. आम्ही तुमच्यासोबत येऊ. बोलून काय होणार? भरपूर वर्ष तुमच ऐकतोय” असं संजय राऊत म्हणाले.