मुंबई : शिंदे गट, अजित पवार गट भाजपात विलीन होणार आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असा दावा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “बेईमान आणि गद्दारांना हिंदुहृदयसम्राट बोलण्याची नवी परंपरा सुरु झाली आहे. राज्यात यांची काय औकात? बाहेरच्या लोकांना काय माहित? शिंदेनी नेमकं काय काम केलं हिंदूत्वासाठी? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “दोनच हिंदुहृदयसम्राट. एक सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे, लोकांनी त्यांनाच मानलं आहे” असं संजय राऊत म्हणाले.
“हे पनवती लोक. भाजपा हरणार. 2014 पासून देशाला पनवती लागलीय. भाजपाला काँग्रेस मुक्त भारत करायचा होता, पण ते झालं नाही. शिवसेना मुक्त महाराष्ट्र करायचा पण ते झालं नाही” असं संजय राऊत म्हणाले. “दहशतवादमुक्त काश्मीर झाला नाही. जवान शहीद होतात. त्यांच्या हत्या होत आहेत. पण त्या बद्दल मोदी-शाह यांनी शोक व्यक्त केला नाही. सर्व लक्ष निवडणूक प्रचाराकडे आहे” असं संजय राऊत म्हणाले.
संजय गायकवाड काय म्हणाले?
‘पुलवामा बद्दल आजही लोकांच्या मनात संशय आहे’ असं संजय राऊत म्हणाले. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात देशाचे 44 जवान शहीद झाले होते. संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिंदे गटातील आणि अजित दादा गटातील आमदार भाजप मध्ये प्रवेश करतील असा संजय राऊत यांचा दावा आहे. त्याला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिलय. “संजय राऊत यांचे आतापर्यंत चे सगळे दावे फेल ठरले. ते जे भविष्यवाणी करतात ,ती कधी खरी ठरली नाही. आता आमचे जाण्यापेक्षा तुमचे किती राहतील?. 31 डिसेंबर पर्यंत आमचे तर कुणी जाणार नाही. पण तुमच्याकडचे आमच्याकडे किती येतील, हे संजय राउत यांनी पाहावं”