रमेश शर्मा, प्रतिनिधी ठाणे | 09 ऑक्टोबर 2023 : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच असावेत. देवेंद्र फडणवीस हे चांगले नेते आहेत. त्यांनी दिल्लीत जावं. देशासाठी चांगलं काम करावं, असं संजय शिरसाट म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चा झाली. भाजपकडून शिरसाटांच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं स्पष्टीकरणही शिरसाटांनी दिलं. या सगळ्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलंय.
संजय शिरसाट यांनी जे काही म्हटलं होतं. त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. मी स्वतः सांगतो की, महाराष्ट्रामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस- अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणून चांगलं काम आमच्या सुरू आहे. राज्याचा विकास वेगाने होत आहे. त्यामध्ये आमच्या तिघांची टीम उत्तमपणे काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव राहिलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी या राज्यामध्ये अनेक चांगले निर्णय घेत आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये 45 हून अधिक जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत आहेत. आम्ही तिघेही एक टीम म्हणून आवश्यक आहोत. महाराष्ट्रामध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे जे अनुभव आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचा सर्वांगीन विकासासाठी आमच्या टीममध्ये आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा विकास आवश्यक आहे. दिल्लीमध्ये खूप मोठे मोठे नेते आहेत. शेवटी हा निर्णय देवेंद्रजी यांचा स्वतःचा असणार आहे. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा असणार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
आज आम्ही जे काम करत आहोत. एकत्र एक दिलाने काम करत आहोत. सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी होतो. तेव्हापासून जनतेच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी आम्ही निर्णय घेत आहोत. अजितदादा आमच्यासोबत आलेत. त्यामुळे आमची एक मजबूत टीम तयार झाली आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.