जयपूर | 18 डिसेंबर 2023 : राजस्थानमध्ये 200 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 115 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले. तर, काँग्रेसला केवळ 69 जागांवर समाधान मानावे लागले. राजस्थानमधील विजयानंतर भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री म्हणून समोर आणले आहे. तर, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री केले. परंतु, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शपथेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी शुक्रवारी जयपूरमधील अल्बर्ट हॉलसमोर आयोजित शपथविधी कार्यक्रमात भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री आणि दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र, याच शपथेवरून दोन्ही उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
राजघराण्यातील दिया कुमारी यांच्यासह डॉ. प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आदींनी दिया कुमारी यांना मिठाई खाऊ घालून त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी दिया कुमारी यांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा आशीर्वाद घेतला होता.
दिया कुमारी यांनी शुक्रवारीच संध्याकाळी औपचारिक पूजेनंतर सचिवालय कार्यालयात पदभार स्वीकारला. दुसरे उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा हे जयपूरच्या दुडू मतदारसंघातून विजयी झाले आहेत. अनुसूचित जातीचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी डॉक्टरेटची पदवी मिळवली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही उपमुख्यमंत्री पीएचडीधारक आहेत.
जयपूरचे वकील ओमप्रकाश सोलंकी यांनी याच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांविरोधात राजस्थान न्यायालयात जनहित याचिका दाखल केलीय. ‘घटनेनुसार उपमुख्यमंत्री यासारखे कोणतेही पद नाही आणि या दोन्ही नेत्यांनी या पदाची शपथ घेतली आहे, असा आक्षेप या याचिकेतून घेण्यात आला आहे.
वकील ओम प्रकाश सोलंकी यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘राजस्थानचे दोन्ही उपमुख्यमंत्री, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. घटनेत उपमुख्यमंत्र्यासारखे कोणतेही पद नाही. हे राजकीय पद आहे आणि ते घटनाबाह्य आहे असे ते म्हणाले.