नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची, तर त्यांचे 50 सहकारी मंत्रिपदाची शपथ घेतील. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्रातील 7 जण मंत्रिपदाची शपथ घेतील.
नितीन गडकरी
नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून 2 लाख 84 हजार 868 मतांच्या फरकाने खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी महाआघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव केला. याआधीही गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज, जलस्त्रोत आणि नदी विकास जलवाहतूक मंत्री होते. मोदींच्या महत्वकांक्षी गंगा शुद्धीकरणाचीही जबाबदारी उमा भारतींकडून गडकरींकडेच सोपवण्यात आली होती.
गडकरींनी 2009 ला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचीही धुरा सांभाळली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे गडकरी दुसरे मराठी नेते होते. कुशाभाऊ ठाकरे हे भाजपचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. यापूर्वी नितीन गडकरी यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. महाराष्ट्रात 1995-99 दरम्यान युती सरकारच्या काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि उड्डाणपूल बांधण्यात आले.
भुषवलेली पदे
पियुष गोयल
पियुष गोयल भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत. माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल हे पियुष गोयल यांचे वडील. नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात 2014 ते 2019 दरम्यान पियुष गोयल यांनी रेल्वे मंत्रालय, अर्थ मंत्रालय, कोळसा आणि खाण मंत्रालय, उर्जा मंत्रालय, अक्षय उर्जा मंत्रालय यासारख्या महत्त्वाची खाती सांभाळली.
प्रकाश जावडेकर
प्रकाश जावडेकर राज्यसभेचे सदस्य असून मोदींच्या मागील मंत्रिमंडळात त्यांनी पर्यावरण मंत्रालयासह मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. जावडेकरांनी त्याआधी मोदी मंत्रिमंडळामध्ये माहिती प्रसारण, संसदीय कामकाज आणि पर्यावरण या 3 खात्यांचे काम पाहिले. त्यानंतर झालेल्या खाते बदलात 2016 रोजी त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
जावडेकर यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. महाविद्यालयीन वयात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले. 1990 ते 2002 दरम्यान ते महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सदस्य होते. 2008 ला ते महाराष्ट्रातून तर 2014 ला मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले.
अरविंद सावंत
अरविंद सावंत हे सलग दुसऱ्यांदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा पराभव केला. दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. देवरा 2004 आणि 2009 मध्ये सलग दोन वेळा निवडून आले. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करुन शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार झाले. यानंतर यावर्षी 2019 मध्येही अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा दक्षिण मुंबईतून काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांचा पराभव केला.
याआधी अरविंद सावंत 1996 ते 2002 आणि 2004 ते 2010 दरम्यान राज्याच्या विधान परिषदेचेही सदस्य होते.
रामदास आठवले
रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख आहेत. आठवले पँथर चळवळीतून पुढे आले. याआधी ते काँग्रेससोबतही गेले. मात्र, 2014 च्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोदींसोबत जाणे पसंत केले. मोदींच्या मागील मंत्रिमंडळात त्यांना सामाजिक कल्याण आणि न्याय राज्यमंत्री म्हणून काम केले. ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार आहेत.
1999 ते 2009 दरम्यान आठवले पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी ते काँग्रेससोबत होते.
रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे 1999 पासून सलग चारवेळा जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत आहेत. ते सध्या महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. दानवेंनी याआधी मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र, त्यानंतर काही काळातच त्यांना राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून पाठवण्यात आले.
दानवेंनी ग्रामपंचायतीपासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. 1980 मध्ये त्यांनी भोकरदन पंचायत समितीची सभापतीपदाची निवडणूक जिंकली. पुढे 1990 आणि 1995 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले. त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवरही निवडून गेले.
दानवेंनी रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभारल्यानंतर आजपर्यंत त्यावर स्वतःचे नियंत्रण ठेवले आहे. दानवेंनी भोकरदन तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले. भोकरदन आणि जाफराबाद पंचायत समित्यांसह जालना जिल्हा परिषदेवरही दानवेंचेच अधिपत्य राहिले आहे. जालना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांच्याकडेच राहिले. सध्या ते जिल्हा बँकेच्या संचालकपदी कार्यरत आहेत.
संजय धोत्रे
संजय शामराव धोत्रे हे भाजपचे अकोल्याचे विद्यमान खासदार आहेत. ते या मतदारसंघात चार वेळ निवडून आले आहेत. 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी विजय मिळवला. संजय धोत्रे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला. संजय धोत्रे यांनी 2014 मध्ये त्यांनी अकोला मतदार संघात विजय मिळवला. त्या निवडणुकीत त्यांना 2 लाख 87 हजार मतं मिळाली. त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर जवळपास 64 हजार मतांनी विजय मिळवला. संजय धोत्रे 1999 ते 2004 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेवरही निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी थेट लोकसभा लढवली आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रात सर्वात मोठ्या राजकीय समीकरणांची नांदी, मनसेकडून पहिले संकेत
प्रकाश आंबेडकरांना हरवणाऱ्या संजय धोत्रेंना मंत्रिपद!
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याची मिझोरामच्या राज्यपालपदी वर्णी निश्चित
पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे अनिल देसाईंच्या नावावर फुली?
अरविंद सावंतांच्या मंत्रिपदावरुन शिवसेनेत दोन गट