नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तीन आमदारांना खासदार बनायचं आहे. तिन्ही आमदारांनी वेगवेगळ्या पक्षाकड़ून तशी तयारी केलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे ही या तिन्ही आमदारांनी तयार ठेवली आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही आमदारांची लोकसभेच्या निवडणुकीसाठी वर्णी लागू शकते. त्यामुळे तिन्ही आमदार चर्चेत आले आहेत.
आमदार हेमंत पाटील
नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. हेमंत हे हाडाचे शिवसैनिक असून, नांदेडच्या तरोडा नाका शाखेचे शाखाप्रमुख ते आमदार अशी त्यांची ओळख आहे. खाजगी बँकेच्या माध्यमातून ते राज्यभर पोहोचले आहेत. बदलत्या राजकीय समीकरणात त्यांचा विधानसभा मतदारसंघ तितकासा सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी जवळच्या हिंगोली लोकसभेच्या मतदारसंघात उडी मारायची ठरवलीय. वसमत ते कन्हेरगाव पुल आणि सेनगाव ते किनवट असा प्रचंड भौगोलिक विस्तार हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आहे. स्वर्गीय उत्तमराव राठोड यांचा अपवाद वगळता हिंगोलीतून कुणीही परत निवडून आलेलं नाही. अठरापगड जातीच्या या मतदारसंघाला कायम नवीन माणसाचं आकर्षण असतं. त्यामुळे आमदार असलेल्या हेमंत पाटील यांनी हिंगोलीवर दावा केलाय.
आमदार प्रताप पाटील चिखलीकर
नांदेडचेच दुसरे एक आमदार प्रताप पाटील चिखलीकर हेही लोकसभेच्या रिंगणात येऊ शकतात. नांदेड लोकसभेसाठी भाजप त्यांना गळ घालते आहे. सर्व जाती धर्माची मते घेणारा माणूस म्हणून प्रताप पाटील यांची ओळख आहे. अशोक चव्हाण यांना कडवी झुंज द्यायची ताकद प्रताप पाटलांमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचे अदृश्य हात असलेले प्रतापराव जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षात लोकप्रिय आहेत. त्यामुळे भाजप त्यांना मैदानात आणू शकते. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास आपली तयारी असल्याचे प्रताप पाटील यांनी स्पष्ट केलंय.
आमदार अमिता चव्हाण
दुसरीकडे नांदेड लोकसभेसाठी काँग्रेस अमिता चव्हाण यांना उमेदवारी मागीतलीय. अशोक चह्वाण यांच्या पत्नी असलेल्या अमीता ह्या भोकर विधानसभेच प्रतिनिधीत्व करतात. अशोक चह्वाण यांच सार लक्ष सध्या राज्याच्या राजकारणात आहे. त्यामुळे लोकसभेला यावेळी ते पत्नी अमीता चव्हाण यांना उभे करण्याच्या तयारीत आहेत. मात्र यावर पक्षाचा निर्णय अद्याप बाकी आहे.