नवी दिल्ली | 4 डिसेंबर 2023 : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. पाच पैकी तीन राज्यांमध्ये भाजपला मोठं यश आलं आहे. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी देशभरातील तब्बल 26 पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांच्या तयार झालेल्या आघाडीला इंडिया आघाडी असं नाव ठेवण्यात आलं आहे. या आघाडीकडून मोदी सरकारचा कसा पराभव करता येईल, यासाठी रणनीती आखली जात आहे. इंडिया आघाडीच्या तीन मोठ्या आणि मॅरेथॉन बैठका याआधी पार पडल्या आहेत. या बैठकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. इंडिया आघाडीची चौथी आणि अतिशय महत्त्वाची बैठक येत्या 6 डिसेंबरला दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. पण या बैठकीआधी इंडिया आघाडीला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे.
इंडिया आघाडीची पाटणा येथे सर्वात पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बंगळुरुत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर तिसरी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकांमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र लढण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आघाडी घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार या पक्षांनी केला होता. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात पुढच्या बैठकांमध्ये चर्चा होईल, असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता दिल्लीत येत्या 6 डिसेंबरला बैठक पार पडत आहे. पण या बैठकीत विरोधी पक्षांमधील डॅशिंग नेत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.
ममता बॅनर्जी यांना या बैठकीत का सहभागी होणार नाहीत? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपल्याला या बैठकीचं निमंत्रण नसल्याचं सांगितलं. “मला इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत काहीच माहिती नाही. मला कुणीही या बैठकीबाबत विचारलेलं नाही. याशिवाय मला कुणीही फोन करुन याबाबतची कल्पना दिलेली नाही. उत्तर बंगालमध्ये माझा सहा ते सात दिवसांचा कार्यक्रम आहे. याशिवाय माझे इतर काही महत्त्वाचे दौरे आणि नियमित कार्यक्रम आहेत. त्यामुळे आता मला बैठकीत बोलावलं गेलं तरी मी माझे नियोजित कार्यक्रम कसे रद्द करु शकते”, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.
भाजपला मध्य प्रदेशात मोठं यश मिळालं आहे. भाजपला मध्य प्रदेशात 163 जागांवर विजय मिळालाय. तर काँग्रेसला 66 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला 54 जागांवर यश मिळालं आहे तर काँग्रेसला 35 जागां जिंकता आल्या आहेत. तसेच राजस्थानध्ये देखील सत्ताबदल घडून आलं आहे. राजस्थानात भाजपला 115 जागांवर विजय मिळाला आहेत. तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या आहेत. तर इतरांना 15 जागांवर यश मिळालं आहे. भाजपला तीन राज्यांमध्ये मिळालेलं यश पाहता आता देशातील नागरिकांचं विरोधी पक्षांकडे लक्ष आहे. विरोधी पक्ष काय रणनीती आखतात यावर आता पुढच्या घडामोडी अवलंबून असणार आहेत.