Mahayuti Meeting Cancel (विनायक डावरुंग) | लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. भाजपा आणि काँग्रेस या देशातील दोन प्रमुख पक्षांनी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केलीय. आता दुसऱ्या यादीची प्रतिक्षा आहे. देशात NDA विरुद्ध INDIA आघाडी असा सामना आहे. तेच महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. महाराष्ट्रात महायुती आणि मविआ दोघांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरत नाहीय. कोण कुठल्या जागेवरुन लढणार? यावरुनच चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. कारण कुठलाही पक्ष सहजासहजी एखाद्या जागेवरुन आपला दावा मागे घेणार नाही. त्याचा मोठा फटका भविष्यात बसू शकतो. महायुती राज्यात सत्तेवर आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत.
महायुतीची आज दिल्लीत होणारी बैठक रद्द झाल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार दिल्लीला रवाना होणार होते. पण आज होणारी बैठक रद्द झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा आणखी लांबणीवर गेलीय. असं वाटत होतं की, मंगळवारपर्यंत कोण कुठल्या जागेवरुन लढणार हे चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. भाजपाच महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटातील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. त्यात आत बैठक लांबणीवर गेलीय.
महायुतीची बैठक रद्द, पण ही बैठक होणार
महायुतीची बैठक रद्द झाली असली, तरी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची संध्याकाळी 6 वाजता बैठक सुरु होईल. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होतील. या बैठकीत महाराष्ट्रातील काही जागांवर चर्चा होऊ शकते. भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर उद्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होऊ शकते. यात महाराष्ट्रातील काही उमेदवारांची भाजपा घोषणा करतो का? याची उत्सुक्ता आहे.