नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड मोठं बहुमत दिलं आहे. 288 सदस्यांच्या विधानसभेत महायुतीचे 230 पेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत. निकालानंतर आज 12 दिवसांनी सरकार स्थापन होणार आहे. महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी आपलं व्हिजन काय असेल? विरोधकांकडून टोकाची टीका झाली, त्यावर भूमिका काय? राज्याला आर्थिक शिस्त कशी लावणार? या सगळ्या मुद्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी भविष्याची दिशा काय असेल, ते स्पष्ट केलय.
मागच्या पाच वर्षात विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड बदनामी केली, त्यांची खलनायकी प्रतिमा रंगवली, त्यावर फडणवीस म्हणाले की, “मी बदल्याच राजकारण करणार नाही. मी त्यांना माफ केलं, हाच त्यांचा बदला. आपल्या राजकीय सोयीसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने महायुतीवर, भाजप आणि माझ्यावर विश्वास टाकून त्यांना परस्पर सडेतोड उत्तर दिलं आहे”
‘आम्ही कोणाचाही आवाज दाबणार नाही’
यंदाच्या विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या फार कमी असेल. महाविकास आघाडीचे 46 आमदार आहेत. बहुमतातील सरकार विरोधकांचा आवाज दाबणार असं बोललं जातय, त्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. “आम्ही कोणाचाही आवाज दाबणार नाही. विरोधकांची संख्या कमी असली, तरी दुर्लक्ष अजिबात करणार नाही. ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना प्रश्न मांडण्याची पुरेपूर संधी दिली जाईल” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राज्याच्या आर्थिक शिस्तीसंबंधीच्या प्रश्नावर काय उत्तर?
लाडकी बहिण तसच अन्य जन कल्याणकारी योजनांवर हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत, त्यामुळे सरकार इतका पैसा कुठून आणणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याच अनुषंगाने राज्याच्या आर्थिक शिस्तीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्याला आर्थिक शिस्तीची गरज आहे, त्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपायोजना या दोन्ही पातळ्यांवर काम करावं लागेल” “आर्थिक शिस्त म्हणजे लोकाभिमुख योजनांना कात्री लावणं असा अर्थ होत नाही” हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं.
लक्ष्य काय असेल?
पाचवर्ष राज्याला गतिमान सरकार देऊन विविध क्षेत्रात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणणं आणि दुष्काळ मुक्त राज्य हेच आपलं लक्ष्य असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.