मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज एकाच वाहनातून प्रवास केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने सातारा नायगाव येथे एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. सध्या छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नाराज आहेत. पक्षाने त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं. त्यांच्यावर पक्षात अन्याय होतोय म्हणून विविध ओबीसी संघटनांनी आंदोलनं केली आहेत. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये सहभागी होणार अशा सुद्धा चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्यास भुवया उंचावणं स्वाभाविक आहे.
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुर्हूतमेढ रोवली. विधवा व परित्क्या यांना त्यांनी जगण्याचा अधिकार दिला. समाजातील कुप्रथा संपवल्या. आज त्यांना अभिवादन करण्यासाठी मी त्यांच्या मूळगावी आलो आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मी त्यांना अभिवादन केलं. नुकतचं त्यांचं दर्शन घेतलं. त्यांच्या स्मारकाचा एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडून होत आहे. त्याचं मी प्रेझेंटेशन घेतलं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “लवकरात लवकर विस्तारित स्वरुपात हे स्मारक व्हावं असा आमचा प्रयत्न असेल” असं ते म्हणाले.
छगन भुजबळांसोबत काय चर्चा?
आज सामनातून गडचिरोलीच्या कामाच कौतुक करण्यात आलय. त्यावर देवेंद्र फडणवीस ‘चांगलं आहे, धन्यवाद’ एवढच म्हणाले. छगन भुजबळ यांच्यासोबत काय चर्चा झाली? त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य पुढे कसं नेता येईल”, या विषयी चर्चा झाली. “त्यांनी देशाला दिशा देण्याच काम केलय. तो विचार सर्वांपर्यंत कसा पोहोचवता येईल, समतायुक्त भारतीय संविधान मानणारा समाज कसा बनवता येईल याविषयी चर्चा झाली” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी उभे होते.