पुणे : ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) सध्या फूल फॉर्मात आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत (shivsena) प्रवेश केल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी सळो की पळो करून सोडलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे तुरुंगात असल्याने त्यांनी शिवसेनेला भासणारी उणीव भरून काढली आहे. सध्या त्यांच्या राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरू असून या यात्रेतून ते बंडखोर आमदारांना लक्ष करत आहेत. आक्रमक भाषण शैली, ओघवतं वक्तृत्व, अभ्यास आणि हजरजबाबीपणामुळे सत्ताधाऱ्यांना त्या नामोहरण करताना दिसत आहे. मात्र, त्यांच्या भाषणावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (trupti desai) यांनी आक्षेप घेतला आहे.
भूमाता ब्रिगेडच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांच्या भाषणावर जोरदार हल्ला चडवला आहे. महाप्रबोधन यात्रेवरून तृप्ती देसाई यांनी सुषमा अंधारे यांना लक्ष केलं आहे. भाषणात आयला आणि आईच्या गावात हे शब्द वापरून महाप्रबोधन करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी मला जावे लागेल, असा खोचक टोला तृप्ती देसाई यांनी सुषमा अंधारे यांना लगावला आहे.
तृप्ती देसाई या केवळ सुषमा अंधारे यांच्या भाषणावर टीका करून थांबल्या नाहीत. तर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडेच साकडं घातलं आहे. उद्धव साहेब या भाषणांकडे लक्ष द्या, अशी मागणीच देसाई यांनी केली आहे. तृप्ती देसाई यांनी केलेल्या या टीकेवर आता सुषमा अंधारे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. सुषमा अंधारे या अत्यंत अभ्यासू नेत्या आहेत. राज्यातील आणि देशातील राजकीय तसेच सामाजिक सांस्कृतिक परिस्थितींचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. ओघवती भाषण शैली हे त्यांचं बलस्थान आहे. सर्वांना समजेल आणि समोरच्या श्रोत्यालाही आपला मुद्दा पटेल इतक्या सहज शैलीत त्या भाषण करतात.
भाषण करताना त्या बऱ्याचवेळा ग्रामीण बोलीचा वापर करत असतात. तसेच भाषणांच्या मध्येमध्ये त्या शेरोशायरीची पखरण करत असतात. कधी आक्रमक तर कधी मृदू भाषेत त्या भाषण करतात. त्यामुळे त्यांचं भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होते. त्या आधी राष्ट्रवादीत होत्या. आता शिवसेनेत आल्या आहेत.