लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा केंद्रात भाजपची सत्ता आली आहे. भाजपची सत्ता आली असली तरी या निवडणुकीत भाजपला मोठा सेटबॅक बसला आहे. भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. भाजपला पूर्ण बहुमत मिळू शकलं नाही. मात्र, मित्र पक्षांच्या मदतीने भाजपने सत्ता काबीज केली आहे. लोकसभेनंतर येत्या चार महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यातील चित्र नेमकं काय असणार आहे? राज्यात कुणाची सत्ता येईल? अशी चर्चा रंगली आहे. राज्याच्या राजकारणाचं चित्र दाखवणारा पोलच टीव्ही9 मराठीने तयार केला आहे. त्यावरून निवडणुका झाल्यास राज्यात कुणाची सत्ता येईल हे स्पष्ट होताना दिसत आहे.
टीव्ही9 मराठीने हा पोल तयार केला आहे. लोकसभेच्या निकालावरून हा आकडा तयार करण्यता आला आहे. या पोलनुसार निवडणुका झाल्यास राज्यात महाविकास आघाडीचं सरकरा येणरा आहे. महाविकास आघाडीला 158 आणि महायुतीला 127 जागा मिळणार असल्याचं चिन्ह आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी अच्छे दिन असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र विधानसभेत 288 जागा आहेत. त्यापैकी 145 जागांना बहुमत आहे. म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र, असं असलं तरी महायुती सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभा राहताना दिसत आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागांमध्ये अवघ्या 31 जागांचा फरक आहे. म्हणजे महायुतीला बहुमतासाठी 18 जागा कमी राहणार असल्याचं दिसत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीतील मुद्दे वेगळे असतात. कारणं वेगळे असतात. विधानसभा निवडणुकीतील मुद्दे वेगळे असतात. शिवाय लोकसभेच्या तुलनेत विधानसभेचा मतदारसंघही लहान असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलू शकतं. म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा कमीही होऊ शकतात किंवा या पेक्षा अधिक वाढूही शकतात. हेच महायुतीच्या बाबतीतही घडू शकतं.
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांपैकी 17 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. अजितदादांच्या 40 पैकी 25 आमदारांच्या विधानसभेत महायुती पिछाडीवर आहे. म्हणजेच लोकसभेतील महायुतीच्या 84 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे असल्याचं या पोलमधून दिसून आलं आहे.
भाजपच्या 105 आमदारांच्या 42 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. शिंदे गटाच्या 40 आमदारांच्या 14 आणि अजित पवार यांच्या 40 आमदारांच्या 25 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे.