मुंबई : ना फूट पडणार आणि ना ही पुन्हा पहाट उगवणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या खुलाशानं हे स्पष्ट झालंय. पण अजितदादांचा वकूबच असाय, की जरी काही काळ त्यांचा फोन बंद झाला, तरी सत्ताकारणाच्या घड्याळाचे काटे उलटे फिरु लागतात. काही सुपातले जात्यात जातात. तर काही जात्यातले सुपात येतात. अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांनीच शहाजी बापू पाटील नॉट रिचेबल झाले. गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रियेस नकार दिला आणि प्रत्येक घडामोडीवरुन पवारांवर टीका करणाऱ्या सदावर्तेंनी इतक्या मोठ्या घडामोडीवर राजकीय प्रतिक्रियेस नम्रपणे नो कॉमेंट म्हटलं.
यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या चर्चांनी शिंदे गटातली चलबिचल प्रकर्षानं समोर आली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी जवळपास सत्तेच्या नव्या लग्नाच्या मुहूर्ताचं भाकीत केलं. राष्ट्रवादी सत्तेत परतल्यास आनंदराव अडसूळांनी स्वबळाचा इशारा दिला. अजित पवार युतीसोबत आल्यास शंभुराज देसाईंनी स्वागताची तयारी ठेवली. संजय शिरसाटांनी आधी अजित पवारांसोबत सत्तेत बसणार नसल्याची भूमिका मांडली. नंतर जर अजित पवार भाजपात आले तर स्वागत करु असं म्हणाले. संजय गायकवाड यांनी अजित पवारांचं स्वागत आहे, पण मुख्यमंत्री शिंदेच राहणार असं सांगितलं. तर विजय शिवतारेंनी अजितदादांनाच शिंदे गटात येण्याची ऑफर दिली.
वारं बदललं की मतं बदलतात, याची प्रचिती मागच्या 3 दिवसात जवळपास प्रत्येक पक्षांच्या भूमिकांमधून दिसली. याआधीच्या भूमिका विसरुन अजित पवारांच्या नव्या मार्गात आता काट्यांऐवजी फुलंच आहेत, असं गुलाबराव अप्रत्यक्षपणे म्हणत होते. आग्या मोहोळवरुन उडालेल्या ठिणग्या विसरत संजय गायकवाड अजित पवारांच्या स्वागतासाठी तयार झाले.
संजय गायकवाडांनी आधी राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसण्यास नकार दिला. नंतर राष्ट्रवादी भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्याचा
अंदाज वर्तवला आणि त्यानंतर अजित पवारांनी भाजपत प्रवेश करावा. मात्र राष्ट्रवादीचा गट आम्हाला मान्य नसल्याची भूमिका घेतली. शिवतारे-अजित पवारांमधलं गाजलेलं चँलेज सर्वश्रूत आहे. पण टीकेची सर्व जळमटं विसरुन शिवतारेंनी पवारांना चक्क ऑफरच दिली. हेच इतर नेत्यांबाबतही घडलं.
स्वतः ‘सामना’तून अप्रत्यक्षपणे अजित पवारांचा गट फुटण्याकडे बोट दाखवणाऱ्या संजय राऊतांचीही भाषा बदललीय. आधी त्यांनीच सामनातून फुटीच्या संकेताची बातमी छापली आणि आता चुकीच्या बातम्यांमुळे मविआवर परिणाम होणार नसल्याचंही राऊतच म्हणतायत. मविआ एकजूट म्हणणारे नाना पटोले फोनवर नेमकं कुणाविषयी बोलत होते? हा संभ्रमही कायम आहे.
आडनावाप्रमाणे पक्षाची अगदी बावनकशी भूमिका मांडणाऱ्या बावनकुळेंनीही चर्चेतल्या बातम्यांमुळे अटींसह स्वागताची प्रतिक्रिया द्यावी लागली. पण या चर्चेत अद्याप दोन नेत्यांच्या स्पष्टपणे प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जेव्हा शिंदेंनी बंड केलं, तेव्हा फडणवीस जवळपास 10 दिवस माध्यमांसमोर आले नव्हते. यावेळीही अजित पवारांच्या संभाव्य चर्चांवर फडणवीसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.