सिंधुदुर्ग : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकण्याबाबतचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओनंतर भाजपने परबांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. त्यानंतर आता शिवसेना अनिल परबांच्या पाठिशी उभी असल्याचं दिसतंय. खासदार विनायक राऊत यांच्यानंतर आता सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही अनिल परब यांची पाठराखण केली आहे.
पर्सनल फोन येतात तेव्हा कुणाचा होता माहित नाही. पण आमच्याकडून कुठलाही दबाव पोलिसांवर नव्हता. त्या क्लीपची देखील माहिती घणे गरजेचे आहे, असं उदय सामंत म्हणाले.
जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. सरकार किंवा पालकमंत्री म्हणून कुठलाही दबाव नाही. जनआशिर्वाद यात्रेचा कुठलाही राजकीय परिणाम कोकणात शिवसेनेवर होणार नाही. परवा घडलेल्या प्रकारात कशाप्रकारे यात्रा काढावी, काय बोलावे याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
यात्रा आहे म्हणून मी कोकणात आहे असे नाही, मी बैठक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी इथे आहे. जनआशिर्वाद यात्रा ही आशिर्वाद घेण्यासाठी असावी. मात्र याचा शिवसेनेवर परिणाम नाही, असा दावा उदय सामंत यांनी केला.
सामानाचा अग्रलेख संजय राऊत यांनी लिहीलाय. त्यात तथ्य असेल म्हणूनच त्यांनी म्हटलं असेल.
शिवसेना नेते परिवहन मंत्री अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी पोलिसांना सूचना दिल्या असतील तर त्यात गैर ते काय? कारण ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ते पोलिसांना सूचना करु शकतात, असं स्पष्टीकरण शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी दिलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेसाठी शिवसेना नेते परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप काल भाजपने केला. भाजपच्या आरोपांना आज विनायक राऊत यांनी उत्तर दिलं.
अनिल परब यांच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जातात, पण रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून ते काम करत असतील तर त्यात गैर आहे असं काही वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले.
परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत आहे. नारायण राणे यांना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता भाजप आणि नारायण राणेंकडून अनिल परबांवर अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
संबंधित बातम्या
EXCLUSIVE : नारायण राणेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी, अनिल परब सतत पोलिसांच्या संपर्कात, अटकेसाठी दबाव?
Anil Parab : नारायण राणेंनी बाह्या सरसावल्या, पहिला धक्का अनिल परबांना देण्याची तयारी
नारायण राणेंच्या अटकेसाठी मंत्री अनिल परबांचे फोन, खासदार विनायक राऊत म्हणतात, ‘मग त्यात गैर काय?’