‘त्या’ निवडणूक प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांची नावे शिवसेना शाखेला कळवा, उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन

| Updated on: May 20, 2024 | 5:59 PM

"दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई मतं नोंदवताना केली जात आहे. मी नागरिकांना आवाहन करतोय, आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका", असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

त्या निवडणूक प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांची नावे शिवसेना शाखेला कळवा, उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन
उद्धव ठाकरे
Follow us on

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचंड संतापले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या टप्प्यात मुंबईतील 6 मतदारसंघांसह राज्यातील एकूण 13 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. मुंबईत मतदानासाठी नागरीक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. पण मतदानकेंद्रांमध्ये निवडणूक प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून मुद्दामून विलंब केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे मतदानकेंद्रावर निवडणूक प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांकडून मुद्दामून आयडी आणि इतर चौकशी करुन वेळा वाया घालवला जात असल्याचं निदर्शनास येत असेल तर त्याची तक्रार जवळच्या शिवसेनेच्या शाखेत करा, असं उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. आपण या अधिकारी आणि निवडणूक प्रतिनिधींची नावे थेट पत्रकार परिषद घेऊन जाहीर करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई मतं नोंदवताना केली जात आहे. मी नागरिकांना आवाहन करतोय, आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदानकेंद्रांमध्ये जावून उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सोडू नका. तुमचं मतदान केल्याशिवाय सोडू नका”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“या माध्यमातून मी पोलिंग एजंटला सांगतोय, तसेच निवडणुकीला जाणाऱ्या मतदारांनाही सांगतोय की, असं कुठलंही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत, जिथे तुम्हाला मुद्दाम उशिर केला जातोय त्याची नोंद ताबोडतोब तिथल्या शिवसेनेच्या शाखेत करा. आपण मतदानाला गेल्यानंतर आपला आयडी बघतो तसं त्या निवडणूक प्रतिनिधींचा आयडीदेखील बघा, जेणेकरुन उद्या आपल्याला न्यायालयात दाद मागितली जाईल. मला त्यांची माहिती मिळाली की, मी त्यांची नावे आणि स्थळांची माहिती पत्रकार परिषद घेऊन जाहीर करुन टाकेन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“मी नागरिकांना आवाहन करतोय, हा मोदी सरकारचा जो डाव आहे की, तुम्ही मतदानाला उतरु नये, त्यांच्या विरोधातील मतदान कमी कसं होईल ते बघत आहेत. त्या डावाला बळी न पडता तुम्ही मतदान केंद्रामध्ये जावून उभे राहा. मतदान केल्याशिवाय मतदानकेंद्र बंद होत नाहीत. त्यामुळे पहाटे पाच वाजले तरी मतदानाचा हक्क बजावा. ज्या ठिकाणी निवडणूक अधिकारी, प्रतिनिधी विलंब लावत आहेत, कारण नसताना तुम्हाला छळत आहेत, तुमची आयडी, नावे, ओळखपत्र यावरुन वेळ लावत आहेत, तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.