शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीव्ही 9 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. उद्धव ठाकरे आजारी असताना आपण त्यांची विचारपूस करण्यासाठी रोज फोन करायचो, असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. तसेच उद्धव ठाकरेंवर कुठलंही संकट ओढवलं तर सर्वात आधी आपण त्यांच्या मदतीला धावून जाणार, असंही मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यांबाबत उद्धव ठाकरे यांना मुलाखतीत विचारण्यात आलं. त्यावर ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.
“मोदीजी सांगत आहेत. ठिक आहे. त्यावेळचं फोन रेकॉर्ड नाही की, त्यांनी किती वेळा चौकशी केली हे सांगायला. पण त्यावेळी माझी परिस्थिती अत्यंत वाईट होती. खांद्यापासून माझी हालचाल बंद झाली होती. त्यावेळी मोदी माझी चौकशी करत असतील तर त्यांना माहीत होते. त्यामुळे तुमचे लोकं माझ्याविरोधात त्यावेळी गद्दारीची कारस्थानं का करत होती? हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम?”, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
“त्यांचेच लोक म्हणत आहेत की, रात्री हुडी घालून गॉगल घालून जायचे. ते काशासाठी जायचे? मला त्यात जायचं नाही. लोकसभेत तुम्ही 10 वर्ष फसवली. तुम्हाला पाच वर्ष काय द्यायची? अग्निवीर… त्यांनी चार वर्ष काम नाही चांगलं केलं तर घरी जाणार. तुम्ही दहा वर्षात काही केलं नाही. तुम्हाला का एक्स्टेंशन द्यायचं?”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“मोदींनाही काही झालं तर मी धावून जाईन. त्यामध्ये काय, ही माणुसकी आहे. हेच तर आमचं हिंदुत्व आहे. ज्यावेळेला आमचा शिवसैनिक नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पूर आला तर हे पूरग्रस्त मुसलमान आहेत, असं बघत नाहीत. ते स्वत:च्या जीवावर उधार होऊन नागरिकांना वाचवतात. यालाच माणुसकी म्हणतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.