अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही शून्य होता, तेव्हा बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं. नाही तर वाजपेयींनी तुम्हाला तेव्हाच केराच्या टोपलीत टाकलं होतं. जर बाळासाहेब ठाकरे नसते, ते आताच्या पंतप्रधानाच्या मागे उभे राहिले नसते तर मोदींचं नाव सर्वोत्कृष्ट पंतप्रधानांच्या यादीत राहिलं असतं का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. गेल्या आठवड्यात ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्ष सोबत घेतला. तुम्ही घरभेदी आहात. घर फोडे आहेत. आमच्या कुटुंबाची निंदा नालस्ती करता. पण आम्ही तुमच्या कुटुंबावर बोलायचं नाही हे कोणतं हिंदुत्व? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदींसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच राणा दाम्पत्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो राहीलच. काही लोक तात्पुरते आहेत. एका चुकीमुळे संसदेत जाऊन बसले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्यांचं नाव न घेता केली.
भाजपचे दोन खासदार होते. तुम्हाला कोणी ओळखत नव्हते. या शिवसैनिकांनी तुम्हाला खांद्यावर घेऊन महाराष्ट्र दाखवला. आम्ही हे भूत मानेवर बसून फिरवलं होतं. आज तुम्ही आम्हाला संपवत आहात? हे तुमचे हिंदुत्व? आम्ही 25 वर्ष सोबत होतो. तरीही आम्हाला संपवलं? असा सवाल त्यांनी भाजपला केला.
हे सर्व पाहून मला भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची दया येते. भाजपचे कार्यकर्ते कुणाचं ओझं घेऊन जात आहेत? मला भाजपच्या कार्यकर्त्यांचा आदर आहे. त्रिपुरात वगैरे भाजपचे लोकांना तुडवलं जायचं. तरीही ते थांबले नाहीत. त्यांनी पक्ष वाढवला. तुमच्या आयुष्याची सतरंज्या झाल्या आहेत. ते सत्तेची हंडी बांधत आहेत. मी पोटतिडकीने भाजप कार्यकर्त्यांबाबत बोलत आहे. भाजप कार्यकर्त्यांचे कुपोषण होत आहे. नको ते लोक ढेकर देत आहेत, अशी तळमळही त्यांनी व्यक्त केली.