निवडणूक अंधेरीत, पण प्रचार संपूर्ण मुंबईत; उटण्याच्या पाकिटातून मशालीचा प्रचार; ठाकरे गटाचा अफलातून फंडा

| Updated on: Oct 19, 2022 | 9:36 AM

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहे. इतर सर्व उमेदवार अपक्ष आहेत. एकही पक्षाचा उमेदवार नाही.

निवडणूक अंधेरीत, पण प्रचार संपूर्ण मुंबईत; उटण्याच्या पाकिटातून मशालीचा प्रचार; ठाकरे गटाचा अफलातून फंडा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतून भाजपने (bjp) माघार घेतला असला तरी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या (uddhav thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (rutuja latke) यांचा प्रचार सुरूच आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून मशाल चिन्हं घरोघरी पोहोचवण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीचं निमित्त साधून ठाकरे गटाने उटण्याच्या पाकिटातून मशाल हे निवडणूक चिन्हं घरोघरी पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे केवळ अंधेरीतच नव्हे तर संपूर्ण मुंबईत उटण्याच्या पाकिटातून मशाल चिन्हं घरोघरी पोहोचवलं जात आहे. निवडणूक अंधेरीत जरी असली तरी मशाल चिन्हं मुंबईतील प्रत्येक घरात पोहोचवण्याच्या ठाकरे गटाच्या या कल्पनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

विधानसभेची पोटनिवडणूक अंधेरी पूर्व या मतदारसंघापुरती असली तरी यानिमित्ताने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मशाल या निवडणूक चिन्हाचा संपूर्ण मुंबईत घराघरांत प्रचार करण्याचा विडा उचलला आहे.ठिकठिकाणी मशाल यात्रा काढण्यात येत असून दिवाळीच्या तोंडावर उटण्याच्या पाकिटाच्या माध्यमातून मशाल निवडणूक चिन्हाविषयी जागृती करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

प्रथमच उद्धव ठाकरे गट हा मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवणे हे ठाकरे यांच्या शिवसेनेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. विविध विभागातील कार्यकर्ते सकाळ-संध्याकाळ घरोघरी फिरून मशाल या निवडणूक चिन्हाचा प्रचार करणार आहेत. पालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. उमेदवार कोण असतील हे ठरलेलं नाही. मात्र, त्यापूर्वीच निवडणूक चिन्हं घरोघरी पोहोचवण्यावर ठाकरे गटाचा भर आहे.

प्रभाग पुनर्रचना, आरक्षण हे सगळेच विषय अडकलेले असले तरी मशाल हे चिन्ह नक्की झाल्यामुळे या चिन्हाचा प्रचार शिवसैनिकांनी सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीचं निमित्त साधून उटण्याच्या पाकिटातून मशाल चिन्हं घरोघरी पोहोचवलं जात आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहे. इतर सर्व उमेदवार अपक्ष आहेत. एकही पक्षाचा उमेदवार नाही. त्यामुळे लटके यांच्यासाठी ही निवडणूक केवळ औपचारिक ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.