“जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. काश्मीर देशाच्या, भाजपाच्या दृष्टीने महत्त्वाच राज्य आहे. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये, देशामध्ये क्रांती होईल हा त्यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग होता. राम मंदिर बनवलं आणि कलम 370 हटवून त्याचा प्रचार करुन मोदी आणि त्यांच्या पक्षाचा काश्मीरमध्ये पराभव झाला हे लक्षात घ्या” असं संजय राऊत म्हणाले. ‘एक राज्य इंडिया आघाडीने आणि एक राज्य भाजपाने जिंकलं’ असं संजय राऊत म्हणाले. “हरियाणाचा पराभव दुर्देवी आहे. काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकली. हरियाणात इंडिया आघाडी झाली असती, सपा, आप, एखादी जागा शिवसेना, एनसीपीला मिळाली असती, तर याचा फायदा इंडिया आघाडीला झाला असता” असं संजय राऊत म्हणाले.
“काँग्रेसला वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू. आम्हाला कोणाची गरज नाही. जिथे काँग्रेस कमजोर असते, तिथे ते प्रादेशिक पक्षाची मदत घेतात. हे भाजपाचच धोरण आहे. जिथे काँग्रेसला वाटतं आपण मजबूत आहोत, तिथे ते स्थानिक पक्ष, इतरांना महत्त्व देत नाहीत. या सगळ्याचा परिणाम हरियाणासारख्या निकालात दिसतो” असं संजय राऊत म्हणाले. “हरियाणाचा पराभव दुर्देवी आहे. यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. देशातील निवडणूक एकत्र लढवावी लागेल. कोणी स्वत:ला छोटा भाऊ, मोठा भाऊ समजू नये. लोकसभेच यश हे इंडिया आघाडीच यश आहे” असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
‘फार मोठा, महान विजय नाहीय’
“हरियाणातील निवडणूक निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिघांची महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व जागरुक आहे” असं संजय राऊत म्हणाले. “हरियाणात भाजपाने मिळवलेला विजय फार मोठा, महान विजय नाहीय. अपक्षांना उभं करुन मत घेतली. पण जो जिंकतो तो सिंकदर असतो” असं राऊत म्हणाले.
काँग्रेसबद्दल महत्त्वाच विधान
काँग्रेसने या संदर्भात काही तक्रारी केल्यात, त्याचा सुद्धा विचार केला पाहिज असं ते म्हणाले. “हरियाणामध्ये 90 जागा आहेत. ते एक छोट राज्य आहे. जाती-पातीची गणित असतात. 36 जागा काँग्रेसला मिळाल्या. बहुमतापासून 9 जागा कमी पडल्या. 25 जागा कमी आहेत असं नाहीय. आम्ही निराश झालेलो नाही” असं संजय राऊत म्हणाले. “काँग्रेस पक्षाला अन्य राज्यातील निवडणुकीसाठी भूमिका घ्यावी लागेल. स्वबळावर लढायचं असेल, तर त्यांनी तशी भूमिका घ्यावी, मग अन्य पक्ष आपआपली भूमिका घेतील” असं संजय राऊत म्हणाले.