पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत रोड शो आहे. पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज महाराष्ट्रात आहेत. नाशिक पिंपळगाव, कल्याण येथे पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभा होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी मुंबईत रोड शो आहे. या रोड शो वरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “आसाममध्ये भाजपाच्या किती जागा येतात ते बघा. आसाममध्ये भाजपाच्या जागा कमी होणार, तिथले मुख्यमंत्री बोलत आहेत” असं संजय राऊत म्हणाले. ‘काशीचा निर्णय तिथली जनता घेईल. मथुरेत हेमा मालिनी हरणार’ असं भाकीत संजय राऊत यांनी केलय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत रोड शो आहे, या पत्रकाराच्या प्रश्नावर त्यांनी ‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी करणारे गृहस्थ आहेत’ असं उत्तर दिलं.
“शिवसेना महाविकास आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावर आणलय. पराभवाच्या भीतीने भाजपा प्रत्येक गल्लीबोळात पंतप्रधान मोदींना फिरवत आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. ‘महाविकास आघाडी मुंबईत 6 जागा लढवत आहे, सर्व 6 जागा जिंकू’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. “पंतप्रधान मोदींना मुंबईत ठाण मांडून बसाव लागतय. तुमच्यावर दररोज भटकण्याची ही वेळ का आली? हे लोकांना कळू द्या” असं संजय राऊत म्हणाले.
‘तिथे 90 टक्के जागा मविआ जिंकणार’
“पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात रोड शो करतात. दुसरं काम नाही का?. मणिपूरला गेले नाहीत. जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांचे अश्रू पुसायला गेले नाहीत. घाटकोपरला 18 लोकांचे मृतदेह सापडलेत, त्यांच्याविषयी संवेदना नाही. आज कदाचित तिथे जाऊन नाटक करतील. मोदी मुंबईत, महाराष्ट्रात जिथे जातील, तिथे पराभव निश्चित आहे” असं संजय राऊत म्हणाले. “महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतलाय. उमेदवार कोणी असो, मोदी नको. मोदी गो बॅक ही गावागावातील घोषणा आहे” असं संजय राऊत म्हणाले. ‘आतापर्यंत जिथे निवडणुका झाल्यात तिथे 90 टक्के जागा मविआ जिंकणार’ असा दावा संजय राऊत यांनी केला.