नागपूर: ठाकरे गटातून फुटून 50 आमदारांनी (mla) सवतासुभा मांडल्यानंतर 12 खासदारांनीही (mp) बंड केलं. हे सर्व खासदार शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आमदारांपाठोपाठ खासदारांनी साथ सोडणं हा उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात होतं. पण आता या धक्क्यातून ठाकरे गट सावरला आहे. या 12 खासदारांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. या बाराही खासदारांच्या मतदारसंघात तगडा उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात ठाकरे गट यशस्वी होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे या बाराही खासदारांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटात गेलेल्या या 12 खासदारांच्या मतदारसंघात लोकसभा उमेदवारांची ठाकरे गटाकडून चाचपणी करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक, यवतमाळ- वाशिम मतदार संघात ठाकरे गटाने तगडा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. पक्ष सोडून गेलेल्या बाराही खासदारांच्या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून तगडा उमेदवाराचा शोध सुरू आहे. त्यामुळे या खासदारांची डोकेदुखी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.
या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात पर्यायी उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाच्या बैठका सुरू आहेत. या बैठकांमधून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. बाराही मतदारसंघात या जोरबैठकांना उधाण आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महाविकास आघाडीने एकत्र लोकसभा लढल्यास विद्यमान शिवसेना खासदारांच्या जागांवर ठाकरे गट दावा करणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आघाडीत या जागा मिळाल्यास 12 बंडखोर खासदारांची चांगलीच पंचाईत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भावना गवळी
राहुल शेवाळे
हेमंत गोडसे
धैर्यशील माने
संजय मंडलिक
राजेंद्र गावित
श्रीरंग बारणे
संजय जाधव
सदाशिव लोखंडे
प्रताप जाधव
कृपाल तुमाणे
हेमंत पाटील
श्रीकांत शिंदे