महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत जागा वाटपाची चर्चा करण्यात येत असून बैठकीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाने मुंबईतील विधानसभेच्या 36 पैकी 20 जागांची मागणी केली आहे. ठाकरे गटाचा मुंबईतील असलेला बेस आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेलं प्रचंड यश यामुळे ठाकरे गटाने आघाडीकडे 20 जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मुंबईतील एका जागेवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने महाविकास आघाडीत एका जागेवरून पेच निर्माण होऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.
वांद्रे येथील हॉटेल ट्रायडंट येथे महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीला आघाडीचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत ठाकरे गटाने आज बॉम्बच टाकला आहे. ठाकरे गटाने मुंबईतील 36 पैकी 20 जागांवर दावा सांगितला आहे. म्हणजेच ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसला केवळ 16 जागा देण्यास तयार असल्याचं दिसून आलं आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईत तीन जागांवर विजय मिळवला होता. एका जागेवर ठाकरे गटाचा निसटता पराभव झाला होता. तर मुंबईत काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाला फक्त प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. त्यामुळे ठाकरे गटाने मुंबईतील जास्तीत जास्त जागांवर दावा सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मुंबईत 16 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला 14 तर काँग्रेसला चार जागा जिंकता आल्या होत्या. समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा जिंकता आली होती. त्यामुळे मुंबईत आपलंच वर्चस्व राहावं, असा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. शिवाय मुंबई महापालिका निवडणूक विधानसभेनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील बेस पक्का करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असल्यानेच त्यांनी 20 जागा मागितल्या असाव्यात असं सांगितलं जात आहे.
या बैठकीत अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघावरून पेच निर्माण झाला आहे. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे. या मतदारसंघातून नवाब मलिक निवडून आले आहेत. पण मलिक सध्या हे अजितदादा गटात आहेत. त्यामुळे या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसने दावा सांगितला आहे. ही जागा सोडण्यास शरद पवार गट तयार नाहीये. पवार गटाला अणुशक्ती नगरमधून रवींद्र पवार यांना मैदानात उतरवायचे आहे. तर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला या मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळाली होती. त्यामुळे ठाकरे गटाला ही जागा हवी आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, ठाकरे गटाने वांद्रेपूर्वेच्या जागेवर दावा सांगितल्याचं कळतं. वांद्रे पूर्वेची जागा काँग्रेसकडे आहे. पण ठाकरे गटाला वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्वेतून उभं करायचं आहे. त्यामुळे त्यांना ही जागा हवी आहे. त्याबदल्यात शिवसेनेची मूळची कांदिवलीची जागा सोडण्यासही ठाकरे गट तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.