मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. मागील काही दिवसांपासून या भेटीची चर्चा सुरु होती. या बैठकीला राव यांच्यासोबत काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही (Prakash Raj) उपस्थित होते. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे देखील या बैठकीत पाहायला मिळाले. या बैठकीनंतर के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकारण गढूळ बनत असल्याचं सांगत आज नवी सुरुवात आम्ही केल्याचं म्हणाले. तसंच याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा इशारा देत भाजपला थेट आव्हान दिलंय.
With Chief minister of Telangana Shri K. Chandrashekar Rao ji @CMOMaharashtra @TelanganaCMO pic.twitter.com/ALzSeA8BgB
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 20, 2022
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशा बातम्या येत होत्या याची आपल्याला कल्पना आहे. त्याचा योग आज आला. कालच शिवरायांची जयंती होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमची भेट होते. आम्ही या भेटीतील काही लपवलं नाही. देशात जे गढूळ वातावरण बनत आहे. सूडाचं राजकारण वाढत आहे. ही आपल्या देशाची हिंदुत्वाची संस्कृती नाही. हे असंच सुरु राहिलं तर देशाला भविष्य काय? याचा विचार कुणीतरी करायला हवा होता. त्याची सुरुवात आज आम्ही केलीय. संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरली आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगना सख्खे शेजारी आहेत. राज्या राज्यात एक आपुलकीचं नातं राहिलं पाहिजे. नवी सुरुवात आज झालीय. त्याला आकार येण्यास वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत. देशातील मुलभूत प्रश्न सोडून इतर विषयांत हात घालण्यातच अनेकजण धन्यता मानत आहेत. पुढे जे काही ठरेल त्यावर वेळोवेळी माहिती दिली जाईल, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद वाटला. ठाकरे आणि आमचं अनेक विषयांवर एकमत झालं आहे. देशातील राजकीय परिवर्तनावर आमच्यात चर्चा झाली. बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच भेटणार असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्याचबरोबर ‘मी साफ करतो की आज एक सुरुवात झाली आहे. आम्ही सर्व सांगितलं आहे. आम्ही देशातील दुसऱ्या नेत्यांशी चर्चा करु. काय अपेक्षित आहे, काय करायला हवं यावर चर्चा होईल आणि तुम्हाला आम्ही त्याबाबत सर्व माहिती देऊ’, असंही राव यावेळी म्हणाले.
इतर बातम्या :