मुंबई : महाविकास आघाडीचा मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारा विषयीची खदखद आपल्या भाषणात व्यक्त करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला. खायचं तर मोकळंच होतं ना रान, मी त्याबद्दल कधीच विचारलं नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. “50 खोके, एकदम ओके”, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर उद्धव ठाकरे आपलं हसू आवरु शकले नाहीत. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.
“कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेच्या सभेमध्ये याच माणसाने नाटक केलं होतं की, भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर जो अन्याय करतोय हे मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. म्हणून मी डोळे मिटून तिकडे जातो, असं असेल तर मला माहिती नाही. तेव्हा आम्ही भाजपसोबत होतो तर भाजप अन्याय करतो, आता काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहोत तर काँग्रेस-राष्ट्रवादी अन्याय करतं. मग नेमकं तुम्हाला पाहिजे तरी काय? बरं खायचं तर मोकळंच होतं ना रान, मी त्याबद्दल कधीच विचारलं नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“माझ्यावर नेहमी आरोप केले जातात, त्याच्यात मला काही वावगं वाटत नाही. पण त्यावेळी तशीच परिस्थिती होती. यांनी घरी बसून सरकार चालवलं, असा आरोप केला जातोय. घरी बसून सरकार चालवलं, पण चालवलं. घरी बसून मी करु शकलो ते तुम्ही सूरत, गुवाहाटी, दिल्ली जावून करु शकत नाही. त्याला मी काय करु शकतो?”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
“कोणी जसं म्हणेल तशी मी भूमिका घ्यायची, एवढं लाचारत्व मी कधीच पत्करलेलं नाही आणि तसं आयुष्यात कधी पत्करणार नाही. विजय साळवे इथे बसले आहेत. कल्याणच्या महापालिकेच्या सभेचे ते साक्षीदार आहेत. तिकडे आता जे बसले आहेत त्यांनी तेव्हा सभेमध्ये नाटक केलं होतं. तेव्हा शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्रीपद ना त्यांनी दिलं आणि ना आम्ही त्यांच्याकडे मागितलं. जी काही खाती मिळाली ती पदरी पडली पवित्र झाली की नाही ते माहिती नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“अफजल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हाच्या सैनिकांना फर्मानं गेली की, गपगुमान अफजल खानासोबत सामील व्हा, नाहीतर कुटुंबासह मारले जाल. अनेकांना फर्मानं गेली. तसंच फर्मान कान्होजी जेधे यांना गेलं. कान्होजी जेधे ते फर्मान घेऊन महाराजांकडे गेले काही त्यामध्ये गेले. त्यांनी महाराजांना फर्मान दाखवलं. त्यावेळी महाराजांनी सांगितलं की, तुम्ही कुटुंबासह मारले जाणार असाल तर मी तरी काय सांगू? जा खानाकडे, तुम्हाला खान राज्यमंत्रीपद देईल, महामंडळ देईल, आमदार करेल, विधान परिषद देईल, राज्यसभा देईल, तुम्ही आनंदात राहाल. मी काय करु शकतो”, असं ठाकरे म्हणाले.
“महाराजांचे ते शब्द ऐकल्यानंतर कान्होजी जेधे ताडकन उठले. त्यांनी हातात तांब्या घेतला आणि हातावर पाणी सोडलं. म्हणाले, मी माझ्या मुला-बाळांवर, कुटुंबावर पाणी सोडलं. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही. आता तसाच काळ आलेला आहे. सामील व्हा, नाहीतर आत जा. एकतर भाजपात नाहीतर तुरुंगात. पण अफजल खानाचं महाराजांनी पुढे काय केलं ते सांगण्याची गरज नाही. ती ताकद, शक्ती आणि तेज आपल्यात आहे की नाही हे महाराज बघत आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.