मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आजच्या निर्णयाने सत्तेसासाठी हपापलेल्या उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड झाली आहे, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. देशात लोकशाहीची हत्या होते की काय असं चित्र आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचे विरोधी एकत्र आले आहेत. आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. मी त्यांचं स्वागत करतो, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
हा केवळ शिवसेनेसाठी निकाल नव्हता. तर लोकशाही जिवंत राहणार की नाही याचा हा फैसला होता. सर्वोच्च न्यायालयाने सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडं नागड्या राजकारणाची चिरफाड केली आहे. राज्यपालांची भूमिका संशयास्प होती. ती सरळ सरळ अयोग्य होती. त्याचं वस्त्रहरण झालं आहे. राज्यपाल ही यंत्रणा आदरयुक्त होती. त्याचे धिंडवडे शासनकर्ते काढत आहेत. त्यामुळे राज्यपाल यंत्रणा ठेवावी की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालयापुढे नेला पाहिजे. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नव्हता, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे ठेवला असला तरी पक्षादेश देण्याचा निर्णय शिवसेनेचाचा राहणार आहे. कोर्टाने विधानसभेचा मान राखला आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या व्हीपनुसारच निर्णय द्यावा लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चूक केली का? असं विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं. मला ज्यांनी दगा दिला. त्यांनी धोका दिला. अशा विश्वासघातकी लोकांनी माझ्यावर अविश्वास ठराव आणावा आणि आम्ही त्याला सामोरे जावं हे माझ्या रक्तात बसणारं नव्हतं. त्यामुळे मी अविश्वास ठरावाला सामोरे गेलो नाही, असं सांगतानाच मी राजकीय नैतिकता म्हणून पदाचा राजीनामा दिला होता. आता तेवढीच नैतिकता शिल्लक असेल तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलं.