मुंबई: शिवसेनेत (shivsena) झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आता पक्षबांधणीच्या कामाला लागले आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार आणि खासदारांच्या बैठका घेतल्या आहेत. तसेच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे मेळावे घेऊन मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि अलिबाग पिंजून काढत आहेत. शिवसेनेला बळ मिळावं आणि शिवसैनिकांनी पुन्हा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कामाला सुरुवात करावी म्हणून उद्धव ठाकरे हे कामाला लागले आहेत. आज त्यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. शिवसेना भवनमध्ये ही बैठक घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंच. शिवाय त्यांचं म्हणणंही ऐकून घेतलं. त्यांच्या मतदारसंघातील परिस्थितीही जाणून घेतली. यावेळी या महिला रणरागिणींनी शिवसेनेची पुनर्बांधणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. गेले ते कावळे, राहिले ते मावळे असं सांगत आमच्या हातात शिवबंध आहे. आम्ही पुन्हा शिवसेना उभी करू, असं या रणरागिणी म्हणाल्या.
साताऱ्याहून आलेल्या शिवसेनेच्या एका पदाधिकारी महिलेने पोटतिकडकीने आपली भावना व्यक्त केली. तसेच तालुक्यातील आमदाराच्या अकार्यक्षमतेचा पाढाही वाचला. गेले ते कावळे राहिले ते मावळे. या मावळ्यांच्या जीवावर अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर आम्ही हिंदुस्थान उभा करू. राज्यभरात शिवसेना पोहचवू. साहेब तुम्ही चिंता करू नका. घाबरू नका. एक पुरुष एका घरात जाऊ शकतो. पण माझी प्रत्येक महिला प्रत्येकाच्या चुलीपर्यंत जाऊन कुटुंबाला पक्षात आणू शकते, असं या महिलेने सांगितलं. तेव्हा शिवसेना भवनात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
सातारा जिल्ह्यातील आमदार गेले. त्यांचं कधी काम नव्हतं. सहकार्य नव्हतं. ते कधी कार्यक्रमाला आम्हाला बोलवायचे नाही. त्यांच्या बॅनरवर आमचे कधी फोटो नव्हते. त्यांनी आमची पत्रं कुठे टाकली माहीत नाही. त्यामुळे ते गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. तुम्ही हवा तो उमदेवार द्या. आम्ही निवडून आणून दाखवू, असं ही महिला म्हणाली.
धारेशिवाय किमत नाही तलवारीच्या पातीला, कसल्या शिवाय पिक नाही जमिनीतल्या माती आणि शिवसेनेशिवाय ,उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही बेरोजगारांच्या साथीला, असं ही महिला म्हणाली. महाराष्ट्रात ताकद उभी करायची असेल तर सर्वांनी उद्धव ठाकरेंच्या पाठी उभे राहा. या महिलांच्या रक्तारक्तात शिवसेना आहे. तुम्ही घाबरू नका साहेब. जे गेले ते जाऊ द्या. कुणाचाही कोण येऊ दे. आम्ही त्यांना कधीच मदत करणार नाही. गेले उडत. आम्ही त्यांच्यासोबत आधीही नव्हतो आणि आताही नाही. आमच्या मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे तयार ठेवलेत, असं दुसऱ्या महिलेने सांगितलं.
प्रचारासाठी आम्ही त्यांच्या मागे जायचो. चपलाही पायात नसायच्या. पण यांना आमची किमत नव्हती. त्यांनी कधी रस्ते बांधले नाहीत. आम्ही अशा लोकांना भीक घालत नाही. आमचं लक्ष्य फक्त धनुष्यबाण आहे. हे कावळे उद्यापासून हिंडणार आहेत. त्यांचा आपल्याला मानसिक त्रास झाला आहे. आमच्या हातात शिवबंधन आहे. आम्ही शिवसेना वाढवल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात जे सहाकर्य केलं त्याची जाणीव ठेवा. या लोकांनी ठेवली नाही. तुम्ही ठेवा आणि शिवसेना वाढवा, असं आवाहन या महिलेने यावेळी केलं.
यावेळी उद्धव ठाकरे यांनीही महिलांना मार्गदर्शन केलं. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं अपघात तर होणार नाही ना! काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर असलेला माईक आपल्याकडे खेचला, पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
महिलांना इथून पुढे राजकारणात 100 टक्के आरक्षण दिले पाहिजे. पुरुषांनी गद्दारी केली. पुरुष फुटले. महिला पाठीशी उभ्या राहिल्या, असं उद्धव ठाकरे गंमतीने म्हणाले.