मुंबई : राज्यात सध्या मनसे आणि शिवसेना असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. राज यांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनीही शनिवारी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा मुन्नाभाई असा उल्लेख करत त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाल्याची टीका केलीय. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर आता शिवसेना नेत्यांकडून प्रतिवार केले जात आहेत. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनीही मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करण्याची गरज उद्धव ठाकरे यांना आहेत. त्यांना लगे रहो मुन्नाभाई चित्रपटाची डीव्हीडी पाठवणार असल्याचंही खोपकर यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बीकेसी मैदानात झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. मुन्नाभाई असा उल्लेख करत चित्रपटाप्रमाणे ही केमिकल लोचाची केस असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय. लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात महात्मा गांधींचे विचार वाचून चित्रपटाचा नायक ते आत्मसात करतो. त्याप्रमाणे राज ठाकरे हे लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. राज यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात केले आहेत. उद्धव ठाकरे यांनाच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याची टीका खोपकर केलीय. उद्धव ठाकरे यांना लगे रहो मुन्नाभाई चित्रपट बहुदा समजलेला नाही. त्यामुळे त्यांनी तो नीट समजून घ्यावा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना चित्रपटाची डीव्हीडी पाठवणार असल्याचंही खोपकर यांनी यावेळी सांगितलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला एका शिवसैनिकांने विचारलं साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? म्हटलं थोडासा पाहिला, का रे? त्यात नाही तो संजय दत्तला गांधीजी दिसतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. मी म्हटलं मग, त्यावर तो म्हणतो तशी एक केस आहे आपल्याकडे. ती नाही का, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली. मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. म्हटलं अरे चित्रपटातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता, हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? तो म्हणाला तसं नाही… चित्रपटाच्या शेवटी त्या मुन्नाभाईला कळतं की साला अपुनके भेजेमे केमिकल लोचा हुआ है… तर ही केमिकल लोचाची केस आहे. हा पिक्चर सत्य घटनेवर आधारीत आहे. असे अनेक मुन्नाभाई फिरतात फिरू द्या. आता कुणाला अयोध्येला जायचं आहे जाऊ द्या’.